मुक्तपीठ टीम
रशिया युक्रेन युद्धाला आता नवं वळण आलं आहे. या युद्धात आता युक्रेनच्या सार्वजनिक प्रयोगशाळांमधील घातक जीवाणूंवर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सुद्धा वक्तव्य केलं आहे. डब्लूएचओने युक्रेनला त्यांच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये साठवलेल्या घातक जीवणूचा नाश करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून त्यांच्या संभाव्य प्रसारामुळे लोकसंख्येमध्ये रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ नये. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता आपल्या सैन्याला विषारी वायूंनी हल्ले करण्याचे आदेश दिल्याचा दावा युक्रेनच्या प्रशासनाने केला आहे.
याचा उद्देश नुकसान रोखणे…
- जीवाणूची गळती होण्याची शक्यता आणि त्यामुळे होणारे नुकसान रोखणे हा त्याचा उद्देश आहे.
- यामुळेच युक्रेनमध्ये काहीही अनुचित होऊ नये म्हणून या जीवाणूंचा तात्काळ नाश करण्याची शिफारस करण्यात आली होती.
- मात्र संस्थेने हा सल्ला केव्हा दिला हे सांगितले नाही किंवा युक्रेनियन प्रयोगशाळांमध्ये असलेल्या रोगजनकांची माहिती दिली नाही.
- दुसरीकडे या संदर्भात युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बॉम्बस्फोटामुळे गळतीचा धोका वाढला…
- दुसरीकडे, जैवसुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया युक्रेनमध्ये ज्या प्रमाणात बॉम्बहल्ले होत आहेत आणि देशाच्या विविध भागांतून त्याचे सैन्य दाखल झाले आहे, त्यामुळे प्रयोगशाळांमधून चुकून जंतू पसरण्याची भीती वाढली आहे.
- त्यामुळे ते गोळा केलेल्या अशा प्रत्येक ठिकाणाचा नाश करण्याची गरज आहे.
अमेरिका आणि युरोपने प्रयोगशाळांना केली मदत
- इतर अनेक देशांप्रमाणेच युक्रेनमध्ये कोरोनासह इतर जीवाणूंचा मानव आणि प्राण्यांवर होणारा परिणाम शोधण्यासाठी अनेक प्रयोगशाळा आहेत, ज्यांना युरोपियन युनियन, अमेरिका आणि WHO कडून मदत मिळाली आहे.
- अलीकडेच, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेवर या प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रे का तयार केल्याचा आरोप करत उत्तरे मागितले होते.
- मात्र वॉशिंग्टन आणि कीव यांनी रशियाचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनवर गॅस हल्ला होण्याची शक्यता
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता आपल्या सैन्याला विषारी वायूंनी हल्ले करण्याचे आदेश दिल्याचा दावा युक्रेनच्या प्रशासनाने केला आहे. हल्ल्यादरम्यान विषारी वायूंपासून बचाव करण्यासाठी रशियन सैनिकांना गॅस मास्कही देण्यात आले आहेत.
- त्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ, युक्रेनियन सैन्याने मीडियाला रशियन सैनिकांकडून जप्त केलेले गॅस मास्क देखील दाखवले.