मुक्तपीठ टीम
सध्या ईडीनं अटक केल्यानंतर ऑर्थर रोड कारागृहात असलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आता रस्त्यावर उतरली आहे. या मोर्चासाठी जमलेल्या हजारोंना संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मात्र, त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक प्रश्नही विचारला,”बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन घेणाऱ्या नवाब मलिक तुरुंगात आहेत. आम्ही त्यांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल, हे विसरू नका.”
फडणवीस पुढे म्हणाले की, “मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असे बाळासाहेब नक्कीच विचारतील. तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू, “बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू,”
महाराष्ट्र सरकारवर दाऊदचा दबाव – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र सरकारवर दाऊदचा दबाव आहे, असा खळबळजनक आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडांचा राजीनामा झाला. केवळ जनतेने आवाज उठवला आणि संवेदनशीलता दाखवून राजीनामा घ्यावा लागला. अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टानं सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यांचाही राजीनामा घेतला गेला. मात्र नवाब मलिकांच्या बाबतीत असं का झालं नाही? नवाब मलिकांना कोठडी दिली तेव्हा दिल्लीचं नाव घेतलं गेलं? पण कोठडी तर न्यायालयानं दिली होती. दाऊदच्या दबावाला दबून राज्य करणाऱ्यांविरोधात हा संघर्ष आहे. विधानसभा सुरु असताना एवढा मोठेआंदोलन सुरु आहे. ज्यांनी राजीनामा घ्यायचा असतो आणि ज्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा घ्यायचा असतो, त्या दोघांना इशारा देण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे.
उद्धव ठाकरे, तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला?
बाळासाहेबांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे, “तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला?” या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नाही. बॉम्बस्फोटात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यांना त्याचीही लाज वाटत नसली तरीही आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठीच आज लाखोंचा जनसागर लोटलाय. देशद्रोह्यांसाठी सरकारमधील नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात. गृहमंत्रीही बसतात. आज गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, अशी कठोर टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.