मुक्तपीठ टीम
उद्योग, व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उच्चपदस्थ महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरु ए डब्ल्यु संतोषकुमार यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी अॅमिटीतल्या वेगवेगळ्या विभागातल्या विद्यार्थ्यांच्या कलांची स्पर्धा करण्यात आली. त्यात एमिटी स्कूल ऑफ फाईन आर्टनं बाजी मारली.
अॅमिटी युनिव्हर्सिटीत अनलॉकनंतर पहिल्यांदाच शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचा जल्लोष साजरा झाला. सर्वच क्षेत्रात स्त्री अधिकार पदांवर पोचली आहे. यापैकी उद्योग, व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रात नाव कमवणाऱ्या आठ सीईओ, प्रेसिडेंट आणि डिन्सचा सत्कार करण्यात आला. अॅमिटीचे प्र-कुलगुरु ए डब्ल्यु संतोषकुमार यांच्यामते हा फक्त पुरस्कार सोहळा नाही तर जागतिक स्तरावर महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव आहे.
याच सोहळ्यात एडेलगीव फौऊंडेशनच्या सीईओ नगमा मुल्ला, परिसर आशा सेंटरच्या सीईओ आरती सावूर यांनीही आपलं मत मांडलं. महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. पण भारतासारख्या देशात त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तेव्हढा सुधारलेला नाही. या विषयावरच या कार्यक्रमात चर्चा झाली. सहभागी झालेल्या सर्वजणी उच्च पदावर होत्या. पुरुषांपेक्षा महिलांकडे व्यवस्थापनाची कला जास्त विकसित झालेली असते. ती आता फक्त घर सांभाळण्यापुरती मर्यादीत राहिलेली नाही. एखादी कंपनी सुरु करुन तिला जागतिक पातळीवर नावारुपाला आणण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. वेलनेस फॉरेवर मेडीकेअर प्रा.लि.च्या सीएचआओ निशिगंधा कुलकर्णी यांनीही याविशयावर मत मांडलं.
वेगवेगळ्या रुपात महिलांनी केलेल्या कामगिरीचा गौरव विद्यार्थ्यांच्या कलाकृतीमधून ही करण्यात आला. योगेश्री ढमाले या विद्यार्थिनीनं माई अर्थात सिंधूताई सकपाळ यांची भव्य दिव्य रांगोळी काढली होती. तिच्या या कलाविष्काराला पहिला क्रमांक मिळाला.
युनिव्हर्सिटी खुली झाल्यानंतर पहिल्यांदाच हे शेकडो विद्यार्थी एकत्र आले आणि जागतिक महिला दिनाचा जागर त्यांनी साजरा केला. अॅमिटी युनिव्हर्सिटीतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.