मुक्तपीठ टीम
अण्णा द्रमुकच्या बडतर्फ नेत्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जुन्या सहकारी व्ही. के. शशिकला तुरुंगवास संपल्यानंतर सोमवारी तामिळनाडूला परतल्या आहेत. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या गुह्यांसाठी चार वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तुरुंगवास संपल्यानंतर तामिळनाडूत येताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत समर्थकांच्या २०० वाहानांचा ताफा होता.
सध्या सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकची स्थिती प्रभावी नेतृत्वाअभावी कमजोर मानली जाते. त्यांना त्यामुळे भाजपशी जुळवून चालावे लागत आहे. त्यामुळे शशिकला यांना त्यांच्या राजकीय पनर्प्रवेशासाठी परिस्थिती सोयीची ठरण्याची शक्यता आहे.
शशिकलांचे भव्य स्वागत
शशिकला कृष्णागिरीच्या आठपल्ली येथे पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव केला. तसेच बंगळुरूपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील होसूर येथील देवी मरिअम्मन मंदिरात त्यांनी पूजा केली. यावेळी शशिकला यांच्यासोबत त्यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरण उपस्थित होते. अण्णा द्रमुकचे अनेक पदाधिकारी शशिकला यांच्या स्वागतासाठी आले होते. तसेच शशिकला ज्या गाडीत बसल्या होत्या ती गाडी देखील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची होती, असेही सांगितले जाते.
काही महिन्यात निवडणुका
तामिळनाडूमध्ये काही महिन्यात विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे. शशिकला यांचा झालेले स्वागतावरून त्यांचे तामिळनाडूमध्ये येणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजही महत्वाचे असल्याचे संकेत मिळतात. ६६ कोटी रुपयांच्या भष्ट्राचाराच्या गुन्ह्याप्रकरणी २०१७पासून शशिकला तुरुंगवास भोगत होत्या. २७ जानेवारी २०२१ रोजी शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, कोरोना संक्रमित आढळल्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले होते. पण त्यावेळीही त्या न्यायालयीन कोठडीच्या आख्यारित होत्या. ३१ जानेवारीला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
शशिकलांसोबत २०० वाहनांचा ताफा
सोमवारी सकाळी शशिकला बेंगळुरमधून निघाल्या तेव्हा त्यांच्यासोबत एएमएमकेचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन होते. मात्र, पुढे तामिळनाडूत पोहचेपर्यंत त्यांच्यासोबत ताफा तयार झाला. किमान २०० वाहनांच्या ताफ्यासह शशिकला पुढे रवाना झाल्या. त्यांनी मास्क घातला होता. तामिळनाडूच्या दिशेने नव्या प्रवासापूर्वी त्यांनी दिवंगत जयललितांच्या छायाचित्राला फुलं अर्पण केली. त्यांनी जयललितांच्या आवडत्या हिरव्या रंगाची साडी घातली होती. होसूरपर्यंतच्या रस्त्यावर त्यांचे प्रशंसक त्यांच्या दर्शनासाठी लोटले होते.
जयललितांचा वारसा मिळवणार?
रस्त्यात अनेक ठिकाणी शशिकलांच्या स्वागतासाठी फलक लागले होते. दिनकरन यांच्या दाव्यानुसार स्वागत करणाऱ्यांमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्यांनी पक्षाचे झेंडेही आणले होते. सोमवारचा त्यांचा ताफ्यासह प्रवास आणि जंगी स्वागत हे शशिकलांचा राजकारणात पुनर्प्रवेश मानला जात आहे. शशिकलांनीही स्वत: राजकारणात सक्रिय होत असल्याची घोषणा केली आहे. अर्थात त्यांच्या राजकारणात परतण्यामुळे सध्याचे प्रस्थापित नेते खूश होतील, असे नाही. त्यामुळे त्यांना नव्याने समीकरणं जुळवत स्वत:चे स्थान घडवावे लागेल. शशिकलांचे सर्वात मोठे बळ अण्णा द्रमुकच्या दिवंगत सर्वेसर्वा जयललितांशी असलेली घनिष्ठता हेच होते. त्यामुळे त्यांचा वारसा मिळवण्यासाठी त्यांनी त्यांना आवडणाऱ्या हिरव्या रंगाची साडी, त्यांना अभिवादन वगैरे सर्व काही केले.