मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता सोमय्यांपुढील अडचणी वाढल्याचे मानले जाते. त्यातच बुधवारी सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे “बाप बेटे तुरुंगात जाणार…केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटही सोबत असणार!” असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही बाजूंचे विचार ऐकलेत तर काही पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे.
अटकपूर्व जामीन का नाकारला?
याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितल्याने सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते.यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
दोन शक्यता
१- अटक
त्यात आतापर्यंत जामीनाचे संरक्षण नसल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला तर अटकेची शक्यता असू शकते. संजय राऊत गेले काही दिवस ज्या आक्रमकतेने सोमय्यांवर तुटून पडलेले आहेत, ते पाहता त्यांनी सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची संपूर्ण तयारी व्हावी, यासाठी प्रयत्न केले असणारच. त्यासाठी पत्रकार परिषदेत न मांडलेले पुरावेही पोलिसांना सादर झाले असण्याची शक्यता आहे.
२- सोमय्यांसाठी न्यायालयीन मार्ग
- न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना सरकारने नील सोमय्यांविरोधात कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याचे कारण दिले आहे.
- त्यामुळे गुन्हा नोंदवला जाताच पुन्हा अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करण्याचा मार्ग असेल, अर्थात पोलीस तेवढा वेळ मिळू देतील का, हा प्रश्न आहेच.
- तसेच त्याआधीही वरिष्ठ न्यायालयांकडून संरक्षण मिळवण्याचा मार्गही सोमय्या स्वीकारू शकतात.
संजय राऊतांनी सोमय्यांवर केलेले आरोप
- भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
- पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत.
- सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक आहे.
- त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत.
- त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत.
- हरित लवादानं अॅक्शन घेतली पाहिजे, तर त्यांच्यावर कारवाई होईल.
- वसईतील मौजे गोखिवरे येथे सोमय्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे.
- वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि लुबाडलं.
- आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले.
- कॅशही घेतली. १०० कोटी घेतले.
- लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या.
- ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांना केली, अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.
- या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.
- आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा.
यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नील सोमय्या यांची सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. अखेर न्यायालयाने निर्णय देत नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.