मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. १५ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेत हे उपोषण मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार आहे. यावेळी ते एकटे उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. दरम्यान संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संभाजीराजे यांच्या उपोषणापूर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.
वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची चर्चा
- गुरुवारी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- संभाजीराजे यांच्या उपोषणापूर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.
- या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभत्कोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे देखील उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या काय आहेत मागण्या?
मागणी – १
मराठा आरक्षणामुळे २०१४ ते ५ मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्याव्यात.
मागणी – २
ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.
मागणी – ३
सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरु करावीत, त्याअतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरु करुन
त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत, संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तात्काळ सुरु करावा,
मागणी – ४
अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस निधी मिळावा, लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी
मागणी – ५
शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जातो, मुंबई, नागपूर पूणे अशा महानगरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये प्रति महिना दिले जाता ही रक्कम वाढवावी.
शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी वसतिगृहांची उभारणी करावी, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीटस निर्माण कराव्या अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.