मुक्तपीठ टीम
रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अखेर युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले आहेत. राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचीही बातमी आहे.
युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे निर्देश दिले आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायानिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.