मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे आता नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याची सरकारची भूमिका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. ते जालना इथे पत्रकारांशी बोलत होते.
काय़ म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?
- आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर भरती प्रक्रियेसाठी नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आहे.
- यावर पोलिसांचा स्पष्ट अहवाल आल्यानंतर त्वरित निर्णय घेतला जाणार आहे.
- पोलिसांचा रिपोर्ट आल्यावरच या संदर्भातला निर्णय होणार आहे.
- पोलिसांचा अहवाल लवकर यावा यासाठी गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत सांगितलेलं आहे.
- पोलिसांनी स्पष्ट अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांना विनंती केलेली आहे.
पुणे पोलिसांचा वेगवान तपास सुरु
२४ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्य विभागाचा गट क चा पेपर फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला होता. दोघे एकमेकांशी संबंधित होते का, याचा तपास सुरू आहे. गट ‘क’ चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या २ दलालांना याआधीच अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.