मुक्तपीठ टीम
एसटी कर्मचारी संपावर उद्या सुनावणी
- संपामुळे एसटीचं हजारो कोटींचं नुकसान
- गेल्या ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
- मात्र यामुळे एसटीच्या उत्पन्नाला १ हजार ६०० कोटींचं नुकसान सोसावं लागलं आहे. सोबतच खेडापाड्यातल्या प्रवाश्यांचेही मोठे हाल होत आहेत. संपावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२२) होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.
एसटीचं मोठं नुकसान
२८ ऑक्टोबर २०२१ पासून शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. आगारात एसटी बाहेर काढण्याचा प्रयत्नही झाला मात्र एसटीवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संपामुळे नोव्हेंबर २०२१पर्यंत एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे नुकसान झालं. हा आक़डा १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे.
सेवा सुरळीत करण्यासाठी एसटीचे प्रयत्न
एसटीच्या दररोजची प्रवासी संख्या ७ लाखाहून अधिक आहे. एसटीच्या दररोज १० हजारांहून अधिक फेऱ्या होतात. एसटीची एकूण कर्मचारी संख्य़ा ८२ हजार ४८९ इतकी आहे. २८ हजार ९३ कर्मचारी कामावर परतलेत. संपात अजूनही ५४ हजार कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या एसटीच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्यासाठी महामंडळाने खासगी चालक, वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १,६०० हून अधिक चालक, खासगी वाहकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुन्हा कर्तव्यावर आलेल्या एसटी चालक, वाहकांकडून सेवा दिली जात आहे. त्याचबरोबरच खासगी चालकांकडून एसटी चालवली जात आहे. आता एका खासगी संस्थेकडून वाहकही नियुक्त केले जाणार आहेत. हे वाहक एसटी बसमध्ये सेवा न देता बस आगार, थांबे येथे उभे राहून प्रवाशांना तिकीट देतील. लवकरच त्यांची नियुक्ती केली जाईल.”
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच
एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्य़ांची संख्या ११ हजार २४ वर पोहोचली आहे. १० हजार ३६२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच आतापर्यंत ९ हजार २५१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.