मुक्तपीठ टीम
गेली काही वर्षे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या वेगळ्या भानगडींमुळे मुंबई पोलीस दल वादात सापडले होते. मात्र, अशा मोजक्यांमुळे होणारी बदनामीची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्यानंतर गाजावाजा न करता मुंबई पोलीस दलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतून आजवर संशयास्पद वर्तन असणाऱ्या ६५ पोलिसांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर वाझे, सुनील माने, रियाज काझी यांना अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना सेवेतूनही दूर करण्यात आले. पोलिसांवरील कारवाई या प्रकरणापुरती मर्यादित ठेवण्यात आली नाही. पुढेही ही मोहिम सुरु ठेवण्यात आली आणि आतापर्यंत ६५ पोलिसांना नोकरीवरून काढण्यात आले आहे.
विभागीय चौकशीनंतर या पोलिसांवर बडतर्फीची कारवाई केली गेली. ज्यासाठी बराच वेळ लागतो, तर सीआरपीसीच्या कलम ३११(२) अंतर्गत काढून टाकताना, महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार असतो. गेल्या वर्षी ८१ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून २४३७ पोलिसांवर विभागीय कारवाई करण्यात आली होती.
मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ जवानांची कमतरता!
- मुंबई पोलिसांचे शासनाने मंजूर केलेले संख्याबळ ४६,२१२ आहे, परंतु सध्या मुंबई पोलिसांकडे केवळ ३७,४६५ कर्मचारी आहेत.
- एकूण ८७४७ जवानांची कमतरता आहे.
- २०१९ पासून मुंबई पोलिसात भरती झाली नाही, त्यामुळे या दोन वर्षांत पोलीस निवृत्त झाल्याने जागा रिकाम्या झाल्या.
- कोरोनामुळे मुंबई पोलिसातही भरती झाली नाही.
- गेल्या दोन वर्षांत १२६ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- त्यात या पोलिसांच्या हकालपट्टींमुळे आणखी रिकाम्या जागा वाढल्या आहेत.