मुक्तपीठ टीम
टाटाच्या एअर इंडियामध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, टाटाने सध्या भन्नाट ऑफर दिली आहे. एअर इंडियाने विमान प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई प्रवासी आता एअर इंडियाच्या तिकिटांवरही एअर एशियामध्ये प्रवास करू शकतात. यासाठी टाटा समूहाने एअर एशियासोबत नवा करार केला आहे. त्यामुळे देशातील लाखो विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात एक करार झाला आहे. दोन्ही एअरलाइन्समधील करारानुसार, ऑपरेशनमध्ये कोणतीही अडचण आल्यास, दोन्ही एअरलाइन्स एकमेकांच्या प्रवाशांना प्रवास करू देऊ शकतील. एअर इंडियाच्या नव्या व्यवस्थेनंतर एअर इंडियाच्या प्रवाशाला त्याच तिकिटावर फ्लाइटच्या बदल्यात कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्याही कंपनीच्या विमानाला उशीर झाल्यास ते दुसऱ्या कंपनीच्या विमानात प्रवास करू शकतील.
दोन्ही विमान कंपन्यांमधील प्रवासाचे नियोजन
- कोणत्याही एका विमान कंपनीचे उड्डाण विस्कळीत झाल्यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी आयआरआरओपी व्यवस्थेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.
- या अंतर्गत, ज्या विमान कंपनीचे विमान प्रथम उपलब्ध असेल, त्या विमानात प्रवासी केवळ एका तिकिटाद्वारे प्रवास करू शकतील.
- आयआरओपी व्यवस्थेअंतर्गत प्रवाशांना फ्लाइट ट्रान्सफर सुविधा पुरविली जाते.
- एअर इंडियाच्या तिकिटांवर एअर एशियामध्ये प्रवास करण्याची प्रणाली १० फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे आणि ती फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहील.
- मात्र, ही व्यवस्था केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू असेल. दोन्ही विमान कंपन्यांमध्ये हा करार पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आला आहे.
- एअर इंडियाच्या नव्या प्रणालीमुळे देशातील लाखो हवाई प्रवाशांना एका तिकिटावर विमान बदलण्याच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.