मुक्तपीठ टीम / पुणे
मुंबई आणि नाशिकनंतर पुणे म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेचा प्रभाव असणारा भाग. त्यातही निवडणुकीच्या राजकारणातही मनसेचं इंजिन मनपात चालवणाऱ्या पुणे शहराला मनसेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानले जाते. हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी मनसेने आता कंबर कसली आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या जोडीला मुंबईतून कुमक देण्यात येत असून स्वत: रा्ज ठाकरेही पुण्याच्या दौऱ्यावर पुन्हा येणार आहेत.
पुण्यात पुन्हा पाय जमवण्यासाठी ‘मनसे’ प्रयत्न
- शिवसेनेत असल्यापासूनच राज ठाकरेंसाठी पुणे हे आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
- पुण्यानेही मनसेला चांगली साथ दिली आहे.
- २००९च्या विधानसभेला विधानसभेवर निवडून गेलेल्या १२ आमदारांपैकी एक पुणे जिल्ह्यातील होता.
- २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते.
- मात्र, पुढे इथर महाराष्ट्राप्रमाणेच पुण्यातही मनसेचा प्रभाव ओसरत गेला.
- तो पुन्हा मिळवण्यासाठीच गेल्यावर्षी आक्रमक आणि सतत विजयी होणारे नगरसेवक वसंत मोरे यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- मात्र, रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्यावेळी पक्ष सोडून अचानक धक्का दिला.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्याची चर्चा!
- आता पुन्हा संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी स्वत: राज ठाकरेंनी लक्ष दिले आहे.
- राज ठाकरे २५ फेब्रुवारीच्या सुमारास पुण्यात येण्याची शक्यता आहे.
- मनपा निवडणूक लक्षात घेत मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे.
- तयारीचा भाग म्हणून प्रत्येक मतदारसंघात मनसे निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
- त्यावेळी ते आगामी पुणे मनपाच्या सर्वच जागा लढवण्याची घोषणेसह इतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही करण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली.