मुक्तपीठ टीम
प्रसिध्द ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्रासोबतच भारत देशात अन संपूर्ण जगामध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.सर्वांचे परिचित असूनही सर्वांचा आदर आणि वेगळ्या प्रकारचा सन्मान यामुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फार महत्त्वाचं स्थान त्यांनी मिळवलं होतं.
तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणून २००६ ते २०१० च्या दरम्यान ते निवडून गेले होते, ते जेव्हा फॉर्म भरायला आले होते त्यावेळेला त्यांची सर्व पक्षांनी मिळून निवड केली होती.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आणि कै. राहुलजी बजाज चांगला संवाद होता, मैत्री होती, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ही स्नेहसंबंध चांगले होते.
ते आणि त्यांच्या पत्नी यांचा आणि माझा परिचय होता. ते जेव्हा विधानमंडळात राज्यसभेचा फॉर्म भरण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या बोलण्यामधून कुठेही आम्हाला त्यांचा अहंकार जाणवला नाही. अत्यंत हसतमुख आणि सकारात्मक
असा दृष्टिकोन बाळगणारे ते व्यक्ती होते. ज्या- ज्या वेळी महाराष्ट्रात संकट आली, त्यावेळी ते मदतीसाठी धावत आले होते. विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेना उपनेता या नात्याने मी त्याना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते, आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते.