मुक्तपीठ टीम
बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.