मुक्तपीठ टीम
पंजाब विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत स्पष्ट दिसत आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्येही काँग्रेस, भाजपा आघाडीला झाडून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी पंजाबी मतदारांना थेट आवाहन केले आहे. ते म्हणाले की गेल्या ७० वर्षांपासून पंजाबला लुटणाऱ्या पारंपरिक राजकीय पक्षांपासून राज्याला वाचवण्याची सुवर्णसंधी मतदारांकडे आहे. तसेच येत्या २० फेब्रुवारीला ‘आप’ला मतदान करा आणि पंजाब वाचवा असे आवाहन केले आहे.
‘आप’ला मतदान करण्याचे भगवंत मान यांचे आवाहन…
- भाजप, काँग्रेस, तसेच पंजाबमधील प्रादेशिक पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
- या निवडणुकीत आम आदमी पार्टीनेदेखील उडी घेतली.
- पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे नऊ दिवस उरले आहेत.
- शुक्रवारी, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी अमृतसरमध्ये अनेक ठिकाणी आप उमेदवार जसविंदर सिंग, बलदेव सिंग, कुलदीप सिंग धालीवाल आणि सुखजिंदर राज सिंग लाली मजिठिया यांच्या समर्थनार्थ प्रचार केला.
- जनतेला संबोधित करताना, पंजाब आप प्रमुखांनी आवाहन केले की त्यांनी पारंपारिक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना मत देऊ नका ज्यांनी राज्य उद्ध्वस्त केले आहे.
- ते म्हणाले की, पंजाबमधील तरुणांना बेरोजगारी आणि योग्य शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे परदेशात जावे लागत आहे.
- मान म्हणाले की आप हा एकमेव पक्ष आहे जो पंजाबला पुन्हा समृद्ध करू शकतो आणि २० फेब्रुवारी रोजी ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन केले.
भगवंत मान म्हणाले की, अमृतसर जगप्रसिद्ध असूनही आजही मूलभूत आधुनिक सुविधांचा अभाव आहे.काँग्रेस, अकाली दल आणि भाजपा सरकारने या सीमाभागातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये विकसित करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. मते मिळवल्यानंतर घराणेशाहीचे स्थानिक राजकीय नेते प्रत्येक वेळी आपापल्या मतदारसंघातून गायब झाले. रत्यामुळेच अटारी, राजसांसी, अजनाळा आणि मजिठिया मतदारसंघात आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.