मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगू लागला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. गेल्या निवडणुकीत एकत्र लढलेले सपा आणि काँग्रेस यावेळी एकमेकांविरोधात लढत आहेत. मात्र, समान शत्रू असणाऱ्या भाजपाविरोधात काही ठिकाणी वेगळी रणनीतीही दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवांविरोधात काँग्रेसने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव लढत असलेल्या जसवंतनगरमध्येही काँग्रेसने आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिलेश यादव यांच्याविरुद्ध काँग्रेसचा एकही उमेदवार नाही
- काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये समाजवादी पार्टी गांधी कुटुंबाविरुद्ध आपले उमेदवार उभे करत नाही.
- याआधीही काँग्रेसने मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नव्हता.
- काँग्रेसने करहाल जागेसाठी आधीच उमेदवार जाहीर केला होता, कारण तोपर्यंत सपाने अखिलेश यादव यांना करहाल मतदारसंघातून उमेदवारी दिली नव्हती.
- पक्षाने येथून ज्ञानवती यादव यांना तिकीट दिले होते, मात्र आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
- या जागेवर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
काँग्रेसही देत नाही सपा, रालोद प्रमुखांविरोधात उमेदवार!
- २०१७ ची विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सपा एकत्र लढले.
- मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही युती तुटली.
- तरीही लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, तसेच मुलायम आणि अखिलेश यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता.
दहा मार्चला कळणार जनमताचा कौल!
- उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
- पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी, तर तिसऱ्या टप्प्यात २३ फेब्रुवारीला २० मतदार मतदान करणार आहेत.
- उत्तर प्रदेशसह निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये १० मार्च रोजी निकाल जाहीर होतील.