मुक्तपीठ टीम
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात इतिहास घडला आहे. तेथे परिसरातील आदिवासी आणि शेतकरी गावकऱ्यांसाठी असलेल्या भगवान सांबरे रुग्णालयातील सारा प्रसुतीगृह आणि शस्त्रक्रिया गृहांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक जिजाऊ संघटनेचे नेते निलेश सांबरे यांनी मोखाड्यातील चिमुरड्याच्या मृत्यूचा संदर्भ देत ही परिस्थिती बदलण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या विवेकभाऊ पंडितांना मार्गदर्शनासाठी आवाहन केले. विवेकभाऊंनी आपल्या भाषणात यापुढील काळात श्रमजीवी संघटना आणि जिजाऊ संघटना हातात हात घालून पालघरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सामान्यांच्या हक्कांसाठी लढणार असल्याची घोषणा केली. स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते जिजाऊ-श्रमजीवी एकत्र आल्याने पालघर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय जीवनात एक नवं पर्व सुरु झालं आहे.
जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मातोश्री भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त झडपोलीतील रुग्णालयाच्या विस्तारीत सेवांचे उद्घाटन करण्यात आले. परिसरातील सामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी २०१६पासून भगवान महादेव सांबरे रुग्णालय चालवले जात आहे. या रुग्णालयात आजवर लाखो रुग्णांनी मोफत किंवा माफक दरातील आरोग्य सेवेचा लाभ घेतला. २०२१ या कोरोना लाटेच्या वर्षात इतर रुग्णालयांचे कामकाज प्रभावित झालेले असतानाही भगवान सांबरे रुग्णालयाची सेवा अव्याहत सुरुच होती. तेथे त्या एका वर्षात दाखल झालेल्या शेकडो रुग्णांप्रमाणेच ओपीडी सेवेचा ७६ हजार ६४५ रुग्णांनी लाभ घेतला. गरोदर महिलांची बाळंतपणासाठी होणारी कुचंबना लक्षात घेऊन तसेच शस्त्रक्रियांसाठी सोसावा लागणारा त्रास दूर करण्यासाठी रुग्णालयाच्या विस्तारीत सेवा सुरु करण्यात आल्या. सारा प्रसुतीगृह आणि शस्त्रक्रिया गृहांचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रमजीवी संघटनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विशेष समितीचे राज्यमंत्री दर्जाप्राप्त अध्यक्ष विवेक पंडित, ठाण्यातील गोडबोले हार्टकेअर रुग्णालयाचे डॉ. राजीव गोडबोले, डॉ. निलीमा राजीव गोडबोले, व्यवस्थापक मनोज मरवडे, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या स्वयंसेविका सविता हरिश्चंद्र तरणे, उद्योजक तुषार राऊळ, इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे अध्यक्ष सनदकुमार प्रभूजी, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे, हेमांगीताई पाटील, मोनिकाताई पानवे, पंकज पवार, अजित जाधव, सांबरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन पळसकर, जिजाऊचे सचिव केदार चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मोखाड्यातील अजय पारधी या चिमुरड्याच्या मृत्यूचा विषय काढला. त्यामुळे आपलं काम अधिक वाढवावं लागेल, असं ते म्हणाले. पुढे त्यांनी पालघर जिल्हा झाला असला तरी जिल्ह्याच्या सुविधा नाहीत. आदिवासी, शेतकरी, मच्छिमार आणि अन्य कष्टकरी समाजबांधवाना माणसासारखं जगणं शक्य होत नसल्याची व्यथा मांडली. जिजाऊ हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्या मातीतील अधिकारी निर्णय घेण्याच्या स्थानी बसवण्याचे प्रयत्न त्यासाठीच सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पण आपली आरोग्य सेवा, शिक्षण सेवा आणि अन्य प्रयत्न हे वाढवणार असल्याचे सांगतानाच त्यांनी पालघरची परिस्थिती बदलण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे नेते आणि ज्येष्ठ समाजसेवक विवेक पंडित यांना साद घातली. विवेकभाऊ, जिजाऊ आणि श्रमजीवी एकत्र ठेवू. समाजाचं भलं करू.
श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनीही आपल्या भाषणात थेट घोषणाच केली. ते म्हणाले, निलेश सांबरे यांनी जिजाऊच्या माध्यमातून उभे केलेले काम, कार्यकर्त्यांची फळी पाहून मला अभिमान वाटला. जिथं आवश्यक होतं तिथं ते काम करत आहेत. आजपासून मी जाहीर करतो की यापुढील काळात श्रमजीवी संघटना जिजाऊसोबत काम करणार. आपण एकत्रपणे पालघरचं चित्र बदलूया.
कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत केले. आजवर संघर्षाचा इतिहास असलेल्या पालघर जिल्ह्यात प्रथमच दोन मोठे नेते आपल्या संघटनांसह एकत्र येत असल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक नवं विकास पर्व सुरु झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.