मुक्तपीठ टीम
काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून मोदी सरकारला फटकारले आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव आहे. त्यांचे ट्विटर फॉलोअर्स सातत्याने कमी होत आहेत. २०२१ च्या पहिल्या सात महिन्यांत आपल्या अकाउंटशी सरासरी ४ लाख फॉलोअर्स जोडले गेले. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ८ दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर ही वाढ अचानक अनेक महिने थांबली.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विटरला एक पत्रही लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्विटर मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी ट्विटरला एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये त्यांनी ट्विटर खात्याचा डेटा देखील शेअर केला आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. आता ट्विटरने या पत्राला उत्तर दिले आहे.
राहुल गांधींच्या आरोपांवर ट्विटरचे उत्तर
- ‘ट्विटर हँडलचे किती फॉलोअर्स आहेत, हे सर्वांना दिसते. आम्ही प्रत्येकाला खात्री देऊ इच्छितो की संख्या सार्थक आणि अचूक आहेत.
- ट्विटर कोणत्याही प्रकारची छेडछाड आणि हस्तक्षेप सहन करत नाही.
- आम्ही धोरणात्मकपणे प्रकरणं हाताळत आहोत, असे ट्विटरने म्हटले आहे.
राहुल गांधींच्या मते, ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांच्या फॉलोअर्समध्ये ५४,८०३ ने घट झाली आहे, तर सप्टेंबरमध्ये १३२७, ऑक्टोबरमध्ये २,३८० आणि नोव्हेंबरमध्ये २,७८८ ने घट झाली आहे. या काळात पंतप्रधान मोदींच्या सर्वाधिक फॉलोअर्समध्ये वाढ झाली असून त्यांची संख्या जवळपास ३० लाख आहे. ट्विटरवर माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. सध्या राहुल गांधींच्या फॉलोअर्सची संख्या १९.६ मिलियन आहे.