मुक्तपीठ टीम
मुंबईतील मालवणी भागातील एका उद्यानाला म्हैसूरच्या टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाने महाराष्ट्रात गदारोळ माजवला आहे. भाजपाच्या भूमिकेनंतर शिवसेनेनेही विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेत हिंदूंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, भाजपा शिवसेनेचे नेते टिपू सुलतानविरोधी भूमिका घेत असले तरी २६ जानेवारीचा दिवस ज्या भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक दिन झाला, भारत प्रजासत्ताक देश झाला, त्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांसह ज्या महापुरुषांची, योद्ध्यांची रेखाचित्र आहेत त्यात झांशीच्या राणींच्या शेजारी टिपू सुलतान यांच्या रेखाचित्रालाही स्थान देण्यात आलं आहे.
मुंबईत का आठवला टिपू सुलतान?
- मुंबई महापालिकेच्या मालाड उपनगरातील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येत आहे.
- स्थानिक आमदार आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख त्याचे उद्घाटन करण्यात येत आहे.
- भाजपाच्या मनपा नेत्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर शिवसेनेही विरोधाची भूमिका घेतली.
- उद्यानाला देऊन टिपू सुलतानचं महिमामंडन केले जात आहे. तो देशाचा गौरव असू शकत नाही. हे त्वरित थांबवलं गेलं पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.
टिपू सुलतान आणि लक्ष्मीबाई यांचे संविधानाच्या मूळ प्रतीत रेखाचित्र!
- भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांची, योद्ध्यांची रेखाचित्रे आहेत.
- त्या प्रतीतच पृष्ठ १४४वर १८५७च्या महान क्रांतीचे दोन योद्धे म्हणून महाराणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांची रेखाचित्र आहेत.
- तसेच नटराज शिव, महात्मा गौतम बुद्ध, गुरु गोविंद सिंग, रामायणातील आकृती, भगीरथ आणि गंगा, पृथ्वीवर अवतरणारी गंगा, मोगल सम्राट अकबर, कुरुक्षेत्रातील कृष्ण आणि अर्जुन, भगवान महावीर आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक प्रकारची रेखाचित्रे आहेत.
आचार्य नंदलाल बोस यांनी सजवली मूळ प्रत!
- भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत सोन्याच्या पानांची चौकट बनवून नंतर तिला कलात्मक आकार देण्याचे काम नंदलाल बोस यांनी केले.
- इतर अनेक पृष्ठे बेहार राम मनोहर सिन्हा यांनी सुशोभित केली होती, ज्यांनी “राम” किंवा “राम मनोहर” म्हणून स्वाक्षरी केली होती.
- स्केचेस आणि गोल्ड-वर्क्सच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मुक्तपीठ भूमिका
- अर्थात तरीही महाराष्ट्राच्या इतिहासात टिपू सुलतानांचं सकारात्मक योगदान नाही.
- त्यांचा संबंध असलाच तर तो त्याच्याविरोधातील लढायांचा आहे.
- त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा गौरव होईल, असे काही करण्याचे कारण नाही.
- धर्मनिरपेक्ष विचारांच्या समर्थक म्हणवणाऱ्यांनी असे प्रकार टाळावे आणि विरोध करणाऱ्यांनी इतर वास्तवही जाणून घ्यावे.