मुक्तपीठ टीम
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून आणि अमर जवान ज्योतीबाबत देशात राजकीय वातावरण चांगलचं रंगलं आहे. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली. यावेळी दिल्लीतील इंडिया गेटजवळ नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सरकारला टोला लगावला आहे.
शशी थरूर म्हणाले की, भारतात नेताजींच्या नावावर १६४ संस्था आहेत आणि या सर्व २०१४ आधीच्या आहेत. नेताजींना फक्त होलोग्राम म्हणून पाहिले जाऊ नये. शशी थरूर म्हणाले की, त्यांच्याकडे केवळ शौर्यच नाही तर काही ठोस तत्त्वेही आहेत जी सध्याचे सरकार सोडत आहे. हे खूप दुःखद आहे.थरूर पुढे म्हणाले की, सरदार पटेल यांच्याबद्दलही अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या, गतकाळातील नेत्यांचा गौरव आम्हीच करत आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे, असं वाटतं. थरूर म्हणाले की, हे अजिबात योग्य नाही.
ते म्हणाले, “नेताजी आणि पटेल साहेबांचा सन्मान होत आहे याचा मला आनंद आहे. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आजही आपण जपलेलं स्वातंत्र्य आपल्याला दिलं त्या सर्वांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की नेताजी फक्त एक प्रतीक किंवा होलोग्राम एवढ्यापुरते मर्यादित राहू नयेत. ते काही प्रशंसनीय मूल्ये आणि तत्त्वांसाठी उभे होते.
थरूर पुढे म्हणाले की ते धर्मनिरपेक्ष होते, त्यांच्या आझाद हिंद फौजेत सर्व धर्माचे लोक होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख ज्यांनी नेताजींच्या खांद्याला खांदा लावून सन्मान आणि विश्वासाने सेवा केली.
पुढे ते म्हणाले, तुम्ही अमर जवान ज्योती विझवू शकत नाही कारण तुम्हाला राष्ट्रीय युद्ध स्मारकावर दुसरी ज्योत लावायची आहे. ज्योत अमर असण्यासाठी आहे, ती अमर आणि शाश्वत असण्यासाठी आहे. केवळ विद्यमान सरकारच्या लहरीपणामुळे जे शाश्वत आहे, ते नष्ट केले जावू शकत नाही.