मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना धमक्या देण्याचे सत्र अजूनही सुरुच आहे.खलिस्तानी गटाच्या धमक्यांच्या मेसेजनंतर आता काश्मिरी मुजाहिदीनची धमकी आली आहे. कॉल रेकॉर्ड करून सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काश्मीरचा ध्वज फडकवला जाईल, असे त्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांना (AOR) केलेल्या कॉलमध्ये, कॉलरने स्वतःला इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासाठी मोदी सरकारइतकेच सर्वोच्च न्यायालयही जबाबदार आहे.
याआधीही सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनाया महिन्याच्या सुरुवातीला, वकिलांना युनायटेड किंगडम आणि कॅनडातील अज्ञात नंबरवरून कॉल आले होते ज्यात पंजाबमधील हुसेनवाला फ्लायओव्हरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा उल्लंघनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी फोन करणाऱ्याने आपण ‘शीख फॉर जस्टिस’चा सदस्य असल्याचा दावा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ‘लॉयर्स व्हॉईस’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा देण्यात आला. लॉयर्स व्हॉईस’ने पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांना धमकी
- १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी समितीची घोषणा केली होती.
- माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
- न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
- जस्टिस इंदू मल्होत्रा यांना या प्रकरणाची चौकशी करू देणार नाही,असे कट्टरवादी संघटनेने म्हटले.
- संघटनेने अनेक वकिलांना व्हॉईस नोट पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे.