मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते.
शरद पवार यांचं ट्विट
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यात आता शरद पवारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
गेल्या २४ तासात राज्यात ४०,८०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर २७,३७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात ४४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५% एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २५५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.