अपेक्षा सकपाळ
कोरोना संकट आल्यापासून आपले काही शिक्षक आपल्या ज्ञानदानाच्या कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील दत्तवाडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शिक्षक बापू बाविस्कर हे नेहमीच वेगळ्या संकल्पना राबवतात. यावेळी त्यांनी तयार केली आहे पॉकेट स्कूलची संकल्पना. कोरोना लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गणित, विज्ञान आणि अन्य महत्वाच्या विषयांचे शैक्षणिक साहित्य एकत्र असलेली पेटी म्हणजे बाविस्कर सरांचे पॉकेट स्कूल. हे पॉकेट स्कूल पूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांसोबत असणार आहे. पॉकेट स्कूल अंतर्गत दिलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने सराव करून घेऊन विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक नुकसान भरून काढायचे आहे. त्यासाठी त्याला या पॉकेट स्कूल अंतर्गत शिक्षक, पालक, वर्गमित्र, गल्ली मित्र तसेच गावातील शिक्षित तरुण वर्ग यांचीही मदत होणार आहे.
बाविस्कर सरांच्या शब्दात वाचा पॉकेट स्कूलची संकल्पना…
नमस्कार मी बापू सुकदेव बाविस्कर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद. आपल्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राबवलेला यशस्वी उपक्रम नेबर कट्टा ( ग्लोबल म्हणून जगात बेस्ट ५० मध्ये समावेश असलेला शिक्षणावर आधारित भारतातील एकमेव उपक्रम ) च्या यशानंतर पुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील अध्यापनातील लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी नवीन अध्ययन अध्यापनात प्रयोग करण्याची आवश्यकता भासली, तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी विषयाची मूलभूत क्षमता विकसित करून घेण्यासाठी पॉकेट स्कूल नावाचा नवीन उपक्रमाची सुरुवात १३ जानेवारी २०२२ पासून केली आहे
पॉकेट स्कूल नावाच्या उपक्रमाअंतर्गत केवळ शाळेतील मुलांचा झालेला लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी भाषा,गणित, इंग्रजी विषयातील मूलभूत क्षमता विकसित करून घेण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या १०० दिवसाच्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेण्यासाठी तसेच माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्तेत वाढ करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी, वाचन-लेखन, गणितीय मूलभूत क्रिया, अभिव्यक्ती,चर्चा, संवाद, हस्ताक्षर सुधारण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत बंद पडलेल्या शाळा मुलांच्या पाकिटात ठेवून ही पॉकेट स्कूल पूर्ण दिवसभर विद्यार्थ्यासोबत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या सवडीनुसार अध्यापनातील लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या लॉकडाऊन काळात झालेला लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी पॉकेट स्कूल अंतर्गत दिलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने सराव करून घेऊन आपला लर्निंग लॉस भरून काढायचा आहे. त्यासाठी त्याला या पॉकेट स्कूल अंतर्गत शिक्षक, पालक, वर्गमित्र, गल्ली मित्र तसेच गावातील शिक्षित तरुण वर्ग यांची मदत होणार आहे.
पॉकेट स्कूलची खास वैशिष्ट्ये
पॉकेट स्कूल पूर्ण दिवस विद्यार्थ्यांला सोबत ठेवणे बंधनकारक आहे.अगदी कोणत्याही परिस्थितीत,व कुठेही
- पॉकेट स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची गरज नाही.
- विद्यार्थी शाळा परिसरात जाऊन किंवा आपल्या परिसरात शिक्षकाच्या मदतीने पाठ्य घटकाची कृती समजून घेतो.
- पाठय घटकाशी संबंधित गणित,भाषा, इंग्रजी पेटीतील शैक्षणिक साहित्याची निवड करून पॉकेट स्कुूलसोबत घेऊन विद्यार्थी त्याच्या सवडीनुसार मिळालेल्या मोकळ्या वेळेत आहे त्या ठिकाणी संबंधित कृतीचा सराव करून घेऊन आपली मूलभूत अध्ययन क्षमता विकसित करून घेईल.
- पॉकेट स्कूल आपल्याला रानात बैल, बकऱ्याचा चारतांना शेताच्या बांधावर, नदीकिनारी व इतस्त अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.
- पॉकेट स्कूल दिवसभर विद्यार्थ्यांसोबत वेगळ्या ठिकाणी फिरते.
- पॉकेट स्कूल अंतर्गत पाठय घटकाच्या सरावासाठी वेळ व ठिकाणाची मर्यादा नाही.
- पॉकेट स्कूल आंतर्गत कृती शिक्षकांकडून समजून घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल तरच पॉकेट स्कूल अंतर्गत कृती सरावाला परवानगी मिळते.
- पॉकेट स्कूल कॅरी करण्यासाठी सहज सोपे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याचे ओझे वाटत नाही.
- पॉकेट स्कूल अंतर्गत मिळणारे शिक्षण कृतीतून मिळत असल्यामुळे विद्यार्थ्याला अध्यापनात आनंद मिळत आहे.
- पॉकेट स्कूल अंतर्गत कृतीचा सराव करतांना मिळालेल्या साहित्यासोबत परिसरातील शैक्षणिक साहित्याचा वापर करून तसेच परिसरातील उपलब्ध मनुष्यबळाची मदत घेऊन आपल्या कृतीचा प्रभावी सराव करून घेताना विद्यार्थी दिसतो.
- पॉकेट स्कूल कोणतीही मर्यादा नाही म्हणून ती गाव,शहर, तालुका,जिल्हा,व राज्याबाहेरही जाऊन आपले कार्य करू शकते.
- पॉकेट स्कूलचा उपयोग आपण ऑफलाइन शिक्षणासोबत ऑनलाइन शिक्षणासाठी ही करू शकतो.
- १०० दिवसाच्या कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी पॉकेट स्कूल फायदेशीर आहे.
- पॉकेट स्कूल अंतर्गत अध्यापनातील लर्निंग लॉस विशिष्ट मुदतीत भरून काढता येईल.
- पॉकेट स्कूल अंतर्गत विद्यार्थी पालकांना इतर कामात मदत करून सुद्धा आपला नियमित अभ्यास करून घेतांना दिसतो.
- पॉकेट स्कूल अंतर्गत विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने आपला लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी मेहनत घेतांना दिसतो.
- पॉकेट स्कूल अंतर्गत कोणत्याही माध्यमांच्या शाळांचा अध्यापनातील लर्निंग लॉस विशिष्ट वेळेत भरून काढता येऊ शकतो.
- पॉकेट स्कूल अत्यंत दुर्गम, डोंगराळ, वाडी,वस्ती तसेच शहरी भागात ही वापरता येऊ शकतो.