मुक्तपीठ टीम
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसातच सुरु होणार आहे. याच दरम्यान संसदेतल्या कर्मचाऱ्यांभोवती कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत संसद भवनातील ७१८ हून अधिक अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू शकते. यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले आढळले आहेत. ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिकारी व्यक्त करत आहेत.
राज्यसभेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “४ डिसेंबरपासून संसद भवनात तपासण्यात आलेल्या लोकांपैकी ७१८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये राज्यसभा सचिवालयातील २०४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित लोकसभा सचिवालय आणि संसदेशी संबंधित आहेत.
९ जानेवारीपर्यंत संसदेत सुमारे ४०० कोरोनाची प्रकरणे होती. नवीन आकडेवारीनुसार संसदेच्या अधिकार्यांमध्ये अवघ्या तीन दिवसांत ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. दोन्ही सभागृहांनी त्यांच्या अवर सचिव/कार्यकारी अधिकारी पदावरील ५०% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यसभेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आयोजन कसे करावे यावर विचारमंथन सुरू आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांना पर्याय शोधण्यास सांगितले आहे.
ते म्हणाले, “आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. परंतु या महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या स्थितीवर अंतिम पर्याय अवलंबून असेल. अधिवेशन कसे चालवायचे याचा निर्णय घेण्यासाठी २५ किंवा २६ जानेवारीच्या आसपास लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांची बैठक होणार आहे.