ज्ञानदेव सुतार
जय जिजाऊ
जिजाबाई शहाजीराजे भोसले यांची संपूर्ण भारत देशात राजमाता जिजाऊ माँसाहेब या नावाने ओळख आहे. जिजामाता शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब होत्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात ‘सिंधखेड’ येथे झाला. जिजाबाईंना त्यांचे जिजाऊ नाव त्यांच्या बालपणापासूनच पडले होते. त्यांना रयतेबद्दल अन् मानवी धर्माबद्दल नेहमीच प्रेम वाटायचे! आपल्या पोटी जन्माला आलेल्या शिवबांना देखील त्यांनी लहानपणापासूनच रयतेबद्दल आणि मानवता धर्माबद्दल निष्ठेचे धडे दिले. जिजाऊ माता यांचेकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करण्यामध्ये जिजाऊंचे यांचे फार मोठं योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
महाराष्ट्रकन्या जिजाऊंची वीरमाता म्हणून सुद्धा भारत देशात ओळख आहे. जिजाऊ केवळ एक स्त्री नव्हत्या, तर त्या एक शूर आई, एक धाडसी पत्नी व एक शूर योद्धा देखील होत्या. प्रसंगी रणांगणात उतरायला देखील त्या कधी डगमगल्या नाही. त्यांचे आपल्या मातृभूमीवर अन् रयतेवर असीम प्रेम होते. त्यांच्या नसानसामध्ये मातृभूमीबद्दल प्रेम भरले होते. त्यांचं जीवन अतिशय संघर्षमय होतं. जीवनात त्यांना नेहमी त्याग, बलिदान अशा गोष्टींना सामोरे जावं लागलं. एका पाठोपाठ एक अशी संकटे त्यांच्यावर येवून पडलीत. प्रत्येक संकटाला त्यांनी शूरवीरपणे लढा दिला. पूर्वी बालविवाह प्रथा होती. जिजामातेचा देखील बालवयातच विवाह झाला. वडील लखुजी जाधव हे निजामशाही मधील एक मातब्बर सरदार होते. लखुजी जाधव यांनी कन्या जिजाऊंचा विवाह भोसले घराण्यातील मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी भोसले यांचेशी सन १६०९ मध्ये करून दिला. शहाजीराजे भोसले देखील एक शूर योद्धा होते. निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते.
राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसलेंची जीवनयात्रा…
नावं : जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म : १२ जानेवारी १५९८
जन्मस्थान : सिंधखेड जि. बुलढाणा महाराष्ट्रराज्य
वडील : लखुजी राजे जाधव
आई : म्हसाळाबाई लखुजी राजे जाधव
पती : शहाजीराजे मालोजीराजे भोसले
मुले : संभाजी राजे व शिवाजी राजे
मृत्यू : १७ जून १६७४
लोकपदवी : जिजाऊ माँ साहेब!
शहाजीराजे यांचे बहुतांश जीवन निजामशहा, मोगल आणि आदिलशहा यांची चाकरी करण्यात गेले. परंतु त्यांचे वडिल मालोजी भोसले यांचेकडून त्यांना पुणे व सुपे येथील जहागीरदारी मिळाली होती. त्यामुळे जिजाऊमाता लग्नानंतर पुण्यामध्ये होत्या. लग्नानंतर या दांपत्यांना एकूण ८ अपत्ये झालीत. त्यामध्ये ६ मुली आणि २ मुलं होती. त्यातीलच एक पुत्र म्हणजे मराठा साम्राज्याचे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज होय! जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी स्वराज्याची घडी बसवली. जिजाऊमुळेच इतिहास घडला. त्यांच्यामुळेच स्वराज्याचे तोरण बांधले गेले, वडील निजामशाहीत सरदार असल्यामुळे लहानपासूनच त्यांना राजकारणातल्या घडामोडी आणि राजकारण समजायला लागलं होतं. जिजाऊंना दूरदृष्टी असल्यामुळेच तोरणा किल्ल्याला महत्त्वाचं समजून त्यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात तोरणा गडापासून पासून केली.
जिजाऊंनी स्वतः शिवबांना तलवार बाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिलं. जिजाऊ स्वतः तलवारबाजी आणि घोडेस्वारीत माहीर होत्या. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडाच्या वेढ्यात अडकले आणि तीन महिने उलटून गेले तरी वेढ्यातून सुटले नव्हते. तेव्हा जिजाऊ काळजीने व्याकुळ होऊन स्वतः घोडेस्वार झाल्या व हातात तलवार घेऊन त्या शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी निघाल्या. परंतु नेताजी पालकर यांनी जिजाऊंना अडवलं आणि ते स्वतः महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळा गडाकडे गेले. अशा सगळ्या घटनांमधून जिजाऊंचे शिवबांप्रती असीम प्रेम अन् माया दिसून येते. कोंढाणा किल्ला ( सिंहगड) काबिज करतांना तानाजी मालसुरे लढाईत धारातीर्थी पडले, तेव्हा त्यांच्या रायबाचं लग्न स्वतः जिजाऊंनी स्वतःच्या हस्ते लावून दिलं. जिजाऊंना आपल्या स्वराज्यातील प्रत्येकच मावळ्याची काळजी होती.
महाराष्ट्राच्या इतिहासात राजमाता जिजाऊंचे स्थान फार उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुतांश प्रदेशांवर ताबा मिळवायला सुरुवात केल्यावर आईसाहेब जिजाऊंना महाराजांचा राज्याभिषेक होणे गरजेचे वाटले. राज्यभिषेकाची तयारी सुरू झाली व महाराजांचा राज्याभिषेक सुरळीतपणे पारही पडला. पण येणार्या संकटाची कुणालाही चाहूल लागली नव्हती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी राजमाता जिजाऊंचे निधन झाले. शिवाजी महाराजांचे प्रेरणास्तोत्र असलेल्या जिजाऊ त्यांच्यापासून दुर निघून गेल्या. जिजाऊंच्या निधनाने रायगडावर दुःखाचे सावट पसरले, स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळला अन् स्वराज्य पोरके झाले. अशा महान स्वराज्य संकल्पिका राजमातेचा जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ जिजाऊसृष्टी सिंधखेडराजा येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून भारतीय लोक दरवर्षी साजरा करतात. यासाठी मराठा सेवा संघ क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या ३ जानेवारी जयंती दिनापासून तर १२ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम (कवन, कीर्तन, प्रबोधन) सादर करुन दशरात्रोत्सव साजरा करतात. दरवर्षी मातृतीर्थावर दहा लाखावर भारतीय उपस्थित राहतात. पाचशेवर केवळ बूकस्टाॅल असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात देशातील बहुसंख्य पुढारी आवर्जून मानवंदनेसाठी हजर असतात.
राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तमाम देशबांधवांना शिवमय शिव शुभेच्छा!
(लेखक ज्ञानदेव सुतार हे संभाजी ब्रिगेड मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत.)