तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
आता वाचा आणि पाहाही तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा:
गल्ली ते दिल्ली…मराठा – ओबीसी – एससी, सर्वच समाजघटकांमध्ये का नाराजी?
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
मुक्तपीठ या मुक्त माध्यमाच्या शुभारंभापासूनच अनेक मित्रांचा, मुक्तपीठवर प्रेम करणाऱ्या अनेकांचा आग्रह होता की मीही व्हिडीओवर भर दिला पाहिजे. मात्र, सुरुवातीला वेबपोर्टलवर लक्ष देणं आवश्यक असल्यानं ते टाळलं. प्रिंटच्या सात वर्षांनंतरचं माझं २० वर्षांचे करिअर हे टीव्हीतील असल्याने व्हिडीओ करायचे होतेच. त्यामुळे आता टीम वेबसाइटची जबाबदारी सांभाळत असताना मी व्हिडीओ स्वरुपातही मांडणी करणार आहे.
पहिला व्हिडीओ हा सरळस्पष्ट चर्चेचा आहे. विषय निवडला तो समाजातील सर्वच घटकांमध्ये सरकारबद्दल असलेल्या नाराजीचा. सध्या राज्यातील मराठा, ओबीसी, एससी म्हणजेच अनुसुचित जाती या तीन मुख्य समाजघटकांमध्ये कमालीची नाराजीची भावना दिसत आहे. सरकार मग ते दिल्लीतील असो वा गल्लीतील, हे समाजघटक नाराज आहेत. त्याची कारणंही तशीच आहेत. पण त्याचवेळी या समाजघटकांच्या मनात उगाचच एकमेकांविषयीही नाराजी आहे. त्यामुळेच आज तीन समाजघटकांमधील ज्येष्ठ साहित्यिक आणि लोकजागरचे नेते ज्ञानेश वाकुडकर, रिपब्लिकन स्टुंडट युनियनचे अमोल वेतम आणि औरंगाबादमधील मराठा सेवक गणेश गोळेकर या तिघांनी सरळस्पष्ट चर्चेत त्या नाराजीला अभिव्यक्त केले.
एससींसाठी संविधानात तरतूद, प्रत्यक्षात मात्र फसवणूक! – अमोल वेटम
गेले काही दिवस अनुसुचित जाती आणि नव बौद्ध समाजावरील शैक्षणिक आर्थिक अन्यायाविरोधात आवाज उठवणारे रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे नेते अमोल वेटम सांगलीहून चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी आकडेवारीसह सरकारी फसवणुकीला उघड केले. बार्टीच्या मुूळ उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप करत त्यांनी काही उपायही सुचवले.
मराठा समाजाची मराठा नेत्यांकडूनही फसवणूकच! – गणेश गोळेकर
औरंगाबादचे मराठा सेवक गणेश गोळेकर यांनी चर्चेत मराठा समाज म्हणजे मातब्बर, तालेवार आणि सत्ताधारी हे गैरसमज असल्याचे ठासून सांगितले. काही घराणी आलटून पालटून सत्तेत असणे म्हणजे समाजाची सत्ता असे नाही, असे त्यांनी मांडले. उलट प्रत्येक राजकीय पक्षाकडून मराठा समाजाची फसवणूकच झाल्याचे त्यांनी मांडले.
सुदाम्याला आता कृष्णाचे पोहे नको, द्वारकाच व्हावी त्याची! – ज्ञानेश वाकुडकर
लोकजागर अभियान, समतावादी हिंदू धर्म परिषदेचे नेते साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी स्पष्ट शब्दात प्रस्थापित यंत्रणेवर प्रहार केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले कारण कोणत्याही ओबीसी नेत्याने काहीच केले नाही. समाजातील प्रत्येक समाज घटकाची फसवणूकच होत आहे.
यावर उपाय म्हणून त्यांनी सर्व समाज घटकांची जनगणना करून त्यांना त्या प्रमाणात वाटा देण्यावर जोर दिला.
आजच्या चर्चेत सहभागी तिघेही मान्यवर हे माणसांमध्ये काम करणारे जमिनीवरचे कार्यकर्ते नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक समाजघटकाची नाराजी उघड होत होती. त्याची कारणं कळत होती. मला वाटतं प्रस्थापित वर्ग हा नेहमीच इतरांचा घात करतो. तो वर्ग म्हणजे एकच जात नाही. प्रत्येक जातीतील, प्रत्येक समाज घटकातील प्रस्थापित प्रवृत्तींना सध्याच्या नाराजीसाठी जबाबदार ठरवले पाहिजे. हक्काचा वाटा न देता, उपकार केल्याचा आव आणणाऱ्या प्रस्थापितांवर प्रहार केले पाहिजेत. अशांमुळेच सर्वच समाज घटकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे थांबवून, परस्परांमधील संघर्ष थांबवत समन्यायी सत्तावाटप असावं. राजकारण्यांची प्रश्न जिवंत ठेवतं, सामान्यांचं टेन्शन तसंच ठेवत इलेक्शन मुद्दा बनवण्याच्या प्रवृत्तीमुळेच नुकसान होत आहे. आता तरी हे सर्व थांबावं.
मुक्तपीठवर महत्वाच्या मुद्दयांवर अशी सरळस्पष्ट चर्चा केली जाईल. तुम्हीही तुम्हाला पाहिजे असणारे विषय, महत्वाचे मुद्दे नेहमी कळवा. मुक्तपीठ हे आपलं मुक्त माध्यम आहे. बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त! हे ध्येय तेव्हाच साध्य होईल जेव्हा आपली साथ मुक्तपीठला विचारांच्या अभिव्यक्तीमधून लाभेल.
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com