मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील एसटी कामगार कृती समितीच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर एसटी टिकली तर रोजगारही टिकणार आहे ही आपली भूमिका असल्याचे सांगत सर्वपक्षीय कामगार नेत्यांनी एसटी कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले. सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात राजकीय नेत्याच्या अभिनिवेशात आक्रस्ताळी भाषणं करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याऐवजी आता अॅड पेंडसे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असतील असेही या कामगार नेत्यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे संप मागे घेण्याचे आवाहन
- एसटी संपामुळे मागील दोन महिने प्रवाशांचे हाल होत होते.
- कोरोनाचं नव संकट महाराष्ट्रावर आलं आहे.
- याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
- महाराष्ट्रातील प्रवाशी वर्ग हा महत्वाचा आहे.
- याआधी परिवहन मंत्री, अधिकारी यांनी जेवढं करता येतील ते केलं आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या मते सरकारी निर्णयामधील कमतरता आहेत.
- त्या कमतरता दूर करण्यासाठी निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली.
- आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा.
कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही
- आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी तीनवेळा आम्ही मुदत दिली होती, यावेळी हेही सांगितलं होतं की, कामावर आल्यावर कारवाई होणार नाही.
- ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही, अशा कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ.
- जसे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमचे दायित्व आहे, तसेच जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल.
- तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे.
- जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही