मुक्तपीठ टीम
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर आणला असून सत्यपाल मलिक यांनी मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतक-यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हटलात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच शेतक-यांचे मारेकरी आहात, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकारी तसेच भाजपाचे सर्व नेते मोदीसमोर मान खाली घालून गप्प बसतात. सत्यपाल मलिक यांनी मात्र धाडस करून सत्यकथन केले आहे. याआधीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन व कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केले होते. शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे हे दुर्दैव आहे. शेतक-यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवळा असण्याचे कारणच नाही. तसे असते तर शेतक-यांची रक्तबंबाळ होईपर्यंत डोकी फोडली नसती, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला नसता, शेतक-यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकले नसते, शेतक-यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारणा-याला अभय दिले नसते.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थोडा आदर्श राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घ्यावा. केंद्र सरकार व भाजपाच्या इशा-यावर काम करणे त्यांनी बंद करावे. राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. सत्याची बाजू घ्यावी, संविधानाच्या तत्वानुसार काम करावे. तुमच्या कामाचे मुल्यमापन इतिहास करेल तेव्हा आपण काय आदर्श ठेवणार आहोत याचा विचार करावा, अशी कोपरखिळी पटोले यांनी कोश्यारी यांना मारली.