मुक्तपीठ टीम
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा… २०२२ वर्षाची सुरुवात एका चांगल्या बातमीने झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइलने १ जानेवारीपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती सध्या १०० रुपयांनी कमी करून लोकांना मोठी भेट दिली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत अजून कोणताही बदल झालेला नाही.
डिसेंबर महिन्यात १०० रुपयांनी वाढले होते दर
- यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली होती.
- डिसेंबरमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ केली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती आणि यावेळीही ही किंमत कायम ठेवण्यात आली आहे.
- व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केल्याने रेस्टॉरंट आणि हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
व्यापारकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी
इंडियन ऑइलने सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर देशातील मोठ्या शहरांवर नजर टाकली तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २००१ रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये २०७७ रुपयांना व्यावसायिक एलपीजी सिलिंडर उपलब्ध होईल. त्याचवेळी मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५१ रुपयांवर पोहोचली आहे.