मुक्तपीठ टीम
साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार, तर संजय वाघ यांना बालसाहित्य पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नाते सांगणाऱ्या, गावखेड्यातले जीवन साहित्यातून मांडणाऱ्या, गाव व शहरातल्या बदलत्या संस्कृतीतले द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या लेखकांना मिळालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांना लिहिण्यासाठी प्रेरीत करेल, यातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ कथासंग्रहास साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार, संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ कादबंरीला बालसाहित्य पुरस्कार, प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहिर झाल्याने मराठी भाषा, संस्कृती, साहित्यातली वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मराठी साहित्यिकांचा राष्ट्रीय स्तरावर होणारा गौरव हा प्रत्येक मराठी भाषाप्रेमीला सुखावणारा आहे. डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण साहित्यिक लिहिते होतील. मराठी भाषा अधिक समृद्ध करतील, असा मला विश्वास आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.
कोंकणी भाषेतील साहित्यासाठीचे पुरस्कारविजेते संजीव वेरेंकार, साहित्य अकादमी वार्षिक पुरस्कार विजेत्या सुमेधा कामत देसाय, बालसाहित्य पुरस्कारविजेत्या श्रद्धा गरड या कोकणी साहित्यिकांसह सर्व पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.