मुक्तपीठ टीम
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या भांडार विभागातील वापराची मुदत संपलेले गाईचे शुद्ध तूप ‘ई निविदा – कम – लिलाव’ ने विक्री करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु मुंबईतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांना ही बाब समताच त्यांनी ‘एफडीए’च्या अहमदनगर येथील वरिष्ठ अधिका-यांना तातडीने संस्थानात पोहचून, या विक्रीसंबंधी चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले. एफडीएच्या तातडीने कारवाई सुरु केल्यानंतर अखेर संस्थानने जुनी निविदा मागे घेतली. आता ते मुदत संपलेले तुप अखाद्य म्हणून विकले जाणार आहे. तरीही ते तसे विकणे धोक्याचेच असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
‘आॅल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’चे (एएफडीएलएचएफ) महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडेय यांनी गाईच्या शुद्ध मुदत संपलेल्या तुपाच्या विक्रीची लेखी तक्रार ‘एफडीए’चे आयुक्त परिमल सिंग यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत, अहमदनगरच्या एफडीएच्या अधिका-यांनी त्वरीत पावले उचलली आणि संस्थानानेही निविदा आॅनलाईन पोर्टलवरुन हटवली आहे, असे पांडेय म्हणाले.
‘‘मे. हर्ष फ्रेश डेअरी प्रॉडक्टस् प्रा. लि., भगवानपूर हरिद्वार. मदरफुड ब्रँड’चे २१८.१० क्विंटल वजनाचे तब्बल १ हजार ४५४ डब्यांची वापराची मुदत ४ आॅक्टोबर २०२१ पर्यंत अशी आहे. त्याचा बॅच क्रमांक ०२ आणि दिनांक ०५ जानेवारी २०२१ असा आहे. ‘ई लिलाव करावयाच्या गाई तुपाचा दर्जा ‘एफएसएसएआय ’ च्या मानकानुसार आहे. परंतू त्याची वापराची मुदत ०४ आॅक्टोबर २१ रोजी संपलेली आहे. ई लिलावातील तुपाचे डबे आहे त्याच स्थितीत विक्री करावयाची आहे. हे डबे संस्थानच्या मध्यवर्ती भांडारमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयात पाहण्यास मिळतील, असे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस) भाग्यश्री बानायत यांनी संवंधित निविदेत नमूद केले आहे.
लिलावात भाग घेणा-यांसाठी काय होत्या सूचना?
या ई निविदा लिलावात सहभागी घेणा-यांसाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निविदा कम लिलावात भाग घेणा-यांसाठी काही लेखी सूचना जारी केल्या होत्या. निविदा कालावधी २ डिसेंबर २१ पासून ते बुधवार, २२ डिसेंबर २१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित संकेतस्थळावर राहिल आणि शुद्ध तूप संस्थानच्या भांडार विभागात कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यास मिळेल ही व अन्य २५ सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जाहिरातीत नमूद केल्या आहेत, असे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.
- ई निविदा कम लिलाव विक्री झाल्यानंतरचे मुदत संपलेले शुद्ध ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वापराची जबाबदारी शुद्ध तुप घेणा-याची राहिल.
- शुद्ध विकत घेतल्यानंतर ‘साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी’ या नावाचा कुठेही वापर करता येणार नाही.
- भांडार विभागातून तुपाचे डबे १५ किलोचा एक डबा, याप्रमाणे वजन करुन देण्यात येईल. नंतर याबाबत तक्रार चालणार नाही, बयाणा रक्कम तीन लाख रुपये आॅनलाईन भरावी. निविदा फी आणि बयाणा रक्कम भरणे बंधनकारक आहे. कुणालाही सूट मिळणार नाही.
मुदत संपलेल्या शुद्ध तुपाची विक्री आता नव्याने “अखाद्य” म्हणून !- संजय शिंदे , सहाय्यक आयुक्त
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या भांडार विभागातील वापरण्यासाठी मुदत संपलेले, गाईच्या शुद्ध तुपाची “अखाद्य ” म्हणून ‘ई विक्री’ने आणि नव्या लिलावाद्वारे करण्याचे आदेश महाराष्ट्र “एफडीए”च्या अहमदनगर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पी. शिंदे यांनी साईबाबा संस्थानच्या संबंधित अधिकारी यांना बजावले आहेत. तुपाची विक्री ‘ई विक्री’ आणि नव्या लिलावाद्वारे करण्याच्या शिंदे यांच्या आदेशानुसार संस्थानने पालन केले आहे, असे सांगण्यात आले. मुदत (एक्सपायरी डेट) संपलेले तूप ‘ई निविदा – कम – लिलाव’ ने विक्री करण्याचा ‘ घाट संस्थानाने घातला होतामुंबईतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांना ही माहिती एका ई मेलद्वारे मिळाली. त्यांनी ‘एफडीए’च्या अहमदनगर येथील वरिष्ठ अधिका-यांना, तातडीने संस्थानात पोहचून या ई विक्रीसंबंधी चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले. संजय शिंदे यांच्या ‘टीम’ने संस्थानात जाऊन मुदत (एक्सपायरी डेट) संपलेल्या तुपाच्या डब्यांची कसून तपासणी केली. “वापरण्यासाठी मुदत संपलेले, गाईच्या शुद्ध तुपाची “अखाद्य ” म्हणून ‘ई विक्री’ने आणि लिलावाने करण्याचे आदेश संजय पी. शिंदे यांनी संस्थानच्या संबंधित अधिकारी यांना बजावले. ‘ऑल इंडिया फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’चे (एएफडीएलएचएफ) महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडेय यांनी, गाईच्या शुद्ध तुपाच्या मुदत संपलेल्या साट्याच्या विक्रीची लेखी तक्रार ‘एफडीए’चे महाराष्ट्र आयुक्त परिमल सिंग आणि सह-आयुक्त शैलेश आढाव यांच्याकडे केली होती. त्यानंतर अहमदनगरच्या एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांनी त्वरीत पावले उचलताच, संस्थानानेही आधीची निविदा ‘ऑनलाईन पोर्टल’वरुन हटवली आहे, असे पांडेय म्हणाले.