दिलीप तिवारी
राज्यातील एकेकाळी १२ खात्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष ॲड. रोहिणी प्रांजल खेवलकर-खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थिरावले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. खडसे मंत्रीपदावर आणि सत्तेच्या विरोधात असताना ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर ते नाराज झाले त्यांची जळगावहून उचलबांगडी झाली. लोहार बंधुंशी खडसेंचा संघर्ष आजही सुरूच आहे. अशावेळी रोहिणी यांच्या वाहनावरील घटनेनंतर पोलिसांसमोर पुढे काय वाढून ठेवलेले असावे ? हे आज सांगता येत नाही.
विधान परिषद निवडणुकीत पुत्राला पराभूत करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि जळगावच्या नगरसेवकांची अवस्था खडसेंनी काय केली हे सर्वांनी पाहिले आहे. शहरातील महामार्ग चौपदरीकरण करताना मनपा मालकीचे समांतर रस्ते (सर्व्हिस रोड) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने तयार करावेत असे ठरत होते. तेव्हा खडसे यांनी त्या समांतर रस्त्यांची जबाबदारी मनपाची आहे असे सांगून त्यात खो घातला होता. व्यक्तीशः आरोप करणाऱ्या भुसावळ येथील दोघा बंधुंना काही वर्षे पळापळ करण्यास खडसेंनी भाग पाडले. स्वतः, पुत्र आणि कन्या यांच्या संरक्षणासाठी खडसे सतत प्रयत्नशील असतात. अर्थात ते असायला हवेच. सत्ता कोणतीही असो खडसे यांची तशी ‘ताकद’ कायम आहे.
असो. हे झाले थोडे विषयांतर. मूळ मुद्दा आहे तो रोहिणी यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि गेल्या वर्षभरात जिल्ह्यात वाढलेल्या खुनाच्या घटना. या दोन बाबी समोर घेता जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का ? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंबहुना सध्याच्या अधिकारी वर्गाला गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही असेही एक बाजूने विश्लेषण केले जाऊ शकते. यापैकी रोहिणी यांच्या संदर्भात घडलेली घटना ही मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील राजकारणाच्या व्यक्तिगत द्वेषाच्या पडसादाचा भाग आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथराव खडसे यांच्यात १५ वर्षांपासूनचे राजकीय वैमनस्य आहे. येथे वैमनस्य हाच शब्द योग्य. त्यांच्यात खेळीमेळीचा विरोध आहे असे फक्त मूर्ख राजकारणी व पत्रकार म्हणू शकतो. दोघांची परस्परांविषयी भाषा काय आहे ? हे सर्वांना माहिती आहे. दोघांच्या राजकारणाची अवस्थाही एकाच खुंट्याला बांधलेली आहे. तो खुंटा राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे. चंद्रकांत पाटील मूळचे शिवसेनेचे. रोहिणी विरोधात राष्ट्रवादीने पुरस्कृत केले म्हणून काठावरील मताधिक्य घेऊन पाटील आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. रवींद्र पाटील हे स्वतःच्या प्रचारासाठी जेवढे फिरले नव्हते तेवढे ते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी फिरले होते. निवडून आल्यानंतर सुरूवातीला आमदार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणतीत होते. पण नंतर खडसेच राष्ट्रावादीत आले आणि आमदार पाटील यांची गणती शिवसेनेत होऊ लागली. म्हणूनच गृहमंत्री खडसेंचे असले तरी मुख्यमंत्री आमदार पाटील यांचे आहेत. हे सर्व वास्तव लक्षात घेतले तर रोहिणी यांच्या गाडीवरील हल्ला हा राजकीय विवादाच्या प्रकारातच मोडतो. तेथे गुन्हेगारी वाढली वा पोलिसांचा धाक संपला असे म्हणताच येत नाही.
आता उरला मुद्दा गेल्या वर्षभरात (सन २०२१) मध्ये जळगाव आणि भुसावळ उप विभागात झालेल्या १८ खून प्रकारांचा. जळगाव उपविभागात १२ आणि भुसावळ उप विभागातील ६ प्रकारांचा. दरमहा १ खून पेक्षा घडलेल्या खून प्रकारांची संख्या जास्त आहे. जवळपास दीड खुनांचे प्रकार झाले आहेत. ही आकडेवारी पुन्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी शंका निर्माण करते. पोलिसांचा धाक नाही असे दर्शवते. मात्र गुन्हेविषयक आकडेवारीचे विश्लेषण करताना घडलेले गुन्हे सराईत गुन्हेगारांनी घडविले की नव्या संशयित आरोपींनी घडविले हे अगोदर तपासायला हवे. जळगाव जिल्ह्यात पोलीस दप्तरात पूर्वाश्रमीचे गुन्हेगार म्हणून नोंद असलेले काही गुन्हेगार आता जनसेवक झाले आहेत. कोणी पालिकेत, कोणी मनपात, कोणी पंचायत समितीत तर कोणी जिपत पदाधिकारी झाले आहेत. हातात तलवारी घेऊन पळण्याचे दिवस संपलेत. आता गुन्हेगारीची ‘ताकद’ वाळूचे ठेके, सट्टाबेटींगचे ठेके, गटारी-रस्ते दुरूस्तीच्या कामांसह लहानमोठे बांधकाम ठेके, देशी दारू वा बियरबार परवाने आदी मिळविण्यातून दाखवली जाते. शुभ्र पांढरे कपडे घालून वरील सर्व कामे करता येतात. शिवाय, पोलिसांच्या शांतता समितीत मान मिळतो. जर हे वास्तव आहे तर मग जळगाव व भुसावळमध्ये खूनाची कृत्ये केली कोणी ? हा प्रश्न उरतोच.
जळगाव व भुसावळमधील खुनाच्या गुन्हांमागील कारणे तपासत असताना लक्षात येते की एकूण १८ पैकी ४ गुन्हे हे सराईत गुन्हेगारांनी केले आहेत. शनिपेठ, जळगाव तालुका, भुसावळ शहर आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील हे ४ गुन्हे आहेत. उरलेले १४ गुन्हे हे सामान्य नागरिकांनी कौटुंबिक अस्वस्थता, मैत्रितील वाद व अन्य कारणांनी केले आहेत. समाजातील बाह्य आणि आंतरिक विस्फोटाची कारणे यामागे आहेत. ती कारणे गुन्हे प्रकारासह सामाजिक प्रश्न या बाजूनेही समजून घ्यायला हवीत. उर्वरित १४ घटनांमध्ये कौटुंबिक वादातील घटना ५, मैत्रितून झालेल्या वादातील ४, अनैतिक संबधातून ३, मनोरूग्ण स्थितीत १, टोचून बोलल्यामुळे ३ आणि किरकोळ विवादातून २ असे प्रकार घडले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पोलिसांकडे उपलब्ध आहे. जवळपास सर्वच प्रकरणांचे तपास पूर्ण करून प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. पोलिसांच्या दृष्टिकोनातून ही कामगिरी समाधानकारक आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी निर्माण होण्याचे दुसरे कारणही आहे. ते म्हणजे पूर्वी जिल्हा व शहरावरील गुन्हेगारीवर लक्ष ठेवणे, एसपी वा समकक्ष अधिकाऱ्यांनी प्रतिबंध वा तपासकामी दिलेली जबाबदारी निभावणे ही कामे जिल्हा गुन्हे शोध शाखा (डीसीबी) आणि स्थानिक गुन्हे शोध शाखा (एलसीबी) करीत असत. या पथकांमध्ये अधिकारी वर्गाची विश्वासाची आणि नेमकेपणाने काम करू शकतील असे कर्मचारी असत. एसपीचे नाक, कान, डोळे या शाखा होत्या. मात्र स्व. अशोक सादरे आत्महत्येच्या प्रकारामागे या दोन्ही पथकांमधील देव-घेवचे व्यवहार आॕडिओ क्लिपमधून चव्हाट्यावर आले. या प्रकारांमुळे दोन्ही पथकांचे खच्चीकरण झाले. गंभीर गुन्हे तपासातील मागोवा घेणारी यंत्रणा अविश्वास पात्र झाली. दुसरीकडे पोलिसठाणे प्रमुख पदांवरील नियुक्तीचा काळा लेखाजोखा सचिन वाझे प्रकरणामुळे समोर आलेला आहे. विमानतळावर पक्षाच्या पदाधिकाऱ्या अडविले म्हणून अधिकाऱ्यांची कंट्रोल रूमला बदली होते आहे. विमानतळावर प्रवेशाचे नियम पदाधिकाऱ्यांनी पाळले होते का ? एसपीकडे पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत नावै दिली होती का ? हा विषय चर्चेत आला नाही. यापूर्वी असे घडलेले नाही. पोलिसांच्या कार्य तत्परतेला व नैतिक धैर्याला आव्हान देणारा हा प्रकार आहे. ही वास्तविकता जर पोलिसांना फक्त ड्युटी करण्यापुरतेच काम सोपविणार असेल तर गुन्हे तक्त्यातील संख्यात्मक आलेख कितीही वाढला तर सामान्य माणसाला फरक काय पडतो ?
दिलीप तिवारी हे उत्तर महाराष्ट्रातील अभ्यासूु, आक्रमक आणि अनुभवी ज्येष्ठ पत्रकार आहेत. स्थानिक राजकारण, समाजकारण तसंच समाजमाध्यमांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.