मुक्तपीठ टीम
भारत बायोटेकने कोरोनावर प्रभावी कोवॅक्सिन लशीची निर्मिती केली. मात्र या स्वदेशी लशीला डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळवण्यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केला आहे. हैदराबादमध्ये आयोजित रामिनेनी फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
‘कोवॅक्सिन”चा मोठा संघर्ष
भारत बायोटेकचे संस्थापक कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांना फाऊंडेशनच्यावतीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला. सरन्यायाधीशांनी सांगितलं की, फायझरसारख्या अनेक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातल्याच काही लोकांच्या मदतीने कोवॅक्सिनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डब्ल्यूएचओकडे तक्रारही दिली आणि या स्वदेशी लशीला मान्यता मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. स्वदेशी लस बनवणाऱ्या आपल्या या तेलुगू भारत बायोटेक कंपनीचं काम जगभरात पोहोचवण्यासाठी सर्व तेलुगू नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे, भारत बायोटेकने जगभरात आपल्या देशाचं नाव उज्वल, प्रसिद्ध केलं आहे.
कोवॅक्सिन अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतिक्षेत
कोवॅक्सिन लशीला अनेक महिन्यांपासून मंजुरीसाठी प्रतिक्षेत राहावं लागलं. अखेर १९ एप्रिलला डब्ल्यूएचओकडून आपत्कालीन वापारासाठी लशीला परवानगी मिळाली. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लशीच्या परवानगीसाठी मूल्यांकनाच्या प्रक्रियेला कधी कधी जास्त अवधी लागतो. संपूर्ण मूल्यांकनाशिवाय लशीला वापराची परवानगी देणं योग्य नाही.