मुक्तपीठ टीम
यंदाच्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबई मनपाचा उद्यान विभाग आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संयुक्त सहयोगाने लोकांना ‘अस्सल सांता’ चा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. #TheRealSanta या आपल्या नवीन उपक्रमाशी जोडले जाऊन त्यायोगे पर्यावरणाचे संरक्षण करावे यासाठी महामंडळाच्या वतीने लोकांना उद्युक्त केले जाणार असून निसर्ग हाच आपल्यासाठी खराखुरा सांता असल्याचा महत्वपूर्ण संदेश हा उपक्रम लोकांपर्यंत पोचविणार आहे. त्यासाठी या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदरेजतर्फे एक भव्य ख्रिसमस कॅप (नाताळची टोपी) तयार करण्यात आली असून ती कार्टर रोड, बांद्रा येथील एका झाडावर ठेवण्यात आलेली आहे.
या झाडाच्या बाजूलाच मुंबईकरांसाठी एक संदेश ठेवण्यात आलेला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘निसर्ग – या खऱ्याखुऱ्या सांताला भेटा’ (‘Meet #TheRealSanta. Nature.’). निसर्ग कायमच आपल्याला कुठलाही पक्षपात न करता, हातचे राखून न ठेवता किंवा कसलाही पूर्वग्रह मनात न ठेवता कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही माणसाला सदैव काही ना काही देतच असतो; आणि त्याबदल्यात कुणाकडून कधीच काहीही मागत नाही. अधिक चांगल्या पर्यायांची निवड करून या निसर्गाचे संवर्धन करण्याची आठवण लोकांना करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमासाठी करण्यात आलेल्या सहयोगाबाबत बोलताना बीएमसीच्या पूर्व उपनगर विभागाच्या माननीय अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, “निसर्ग हाच आपला खरा सांता असल्याची ख्रिसमस संकल्पना जेव्हा गोदरेज इंडस्ट्रीजने आमच्यासमोर मांडली, तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. सध्याच्या काळात आणि वातावरणात निसर्गाचे संरक्षण करण्याबाबत जागरूकता आणि संवाद निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे, आणि आम्हाला असे वाटते की अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी हीच सुयोग्य वेळ आहे. मानवतेला एक अधिक चांगले भविष्य मिळावे यासाठी आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करण्याची आपणा सर्वांनाच किती गरज आहे, हा संदेश सर्वत्र पोचविण्यासाठी हा सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.”
या उपक्रमाबाबत बोलताना चीफ ब्रँड ऑफिसर आणि कार्यकारी संचालक तान्या दुभाष म्हणाल्या, “गोदरेजमध्ये आम्ही कायमच उत्तम आणि हरित अर्थात ‘गुड अँड ग्रीन’ या मार्गावरून वाटचाल करत असतो, ज्यामध्ये आम्ही नफ्यापेक्षाही आपल्या लोकांना आणि धरणीला अधिक झुकते माप देतो. आम्ही ज्या प्रकारे कार्य करतो तेथपासून ते आम्ही आमची उत्पादने कशी आरेखित करतो तिथपर्यंत; आम्ही जे काही करतो, त्याच्या अंतःकरणाशी आमचे हेच ध्येयधोरण सामावलेले असते. पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत समाजात जागरूकता वाढीस लागत असताना आमच्या असे लक्षात आले की ‘गुड अँड ग्रीन’ या संदेशाचा अधिक जोमाने प्रसार करण्यासाठी ख्रिसमस ही एक अप्रतिम संधी आहे, ज्यायोगे आम्ही निसर्गालाच खराखुरा सांता म्हणून लोकांच्या नजरेसमोर आणू शकतो. निसर्ग आणि विशेषतः झाडे हाच रिअल सांता (#TheRealSanta.) आहे, हा संदेश लोकांच्या मनात रुजविण्यासाठी बीएमसीच्या उद्यान विभागासोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या भावी आपण पिढ्यांना एक सुंदर जग देऊ शकू अशी आम्हाला आशा आहे. कार्टर रोड, बांद्रा येथील झाडावर लावलेली भव्य ख्रिसमस कॅप सर्वांनी अवश्य बघा.”
पाहा व्हिडीओ: