मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना मंदावत असताना पहिली ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र नवी मुंबईतील घणसोली येथील एका शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना स्थानिक कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना नवी मुंबई मनपाच्या (NMMC) अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व विद्यार्थी इयत्ता ८वी ते ११वी पर्यंतचे आहेत.भिवंडीतील वृद्धाश्रमात नव्वद वृद्धांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतील शाळेत कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ माजली आहे. पण यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक मानले जात आहे.
कोरोनाची लागण झालेल्या एका विद्यार्थ्याचे वडील नुकतेच कतारहून परतले होते. शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही बातमी समोर आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. NMMC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत शाळेत ८११ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी इतर ६०० विद्यार्थ्यांचीही चाचणी होणार आहे.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
गेल्या २४ तासात राज्यात ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्णमुंबईआणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. तर त्यापैकी २५ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत.