मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपा चांगलीच अडचणीत आली. त्याप्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचे वडिल अजय मिश्रा हे केंद्रात मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्या हकालपट्टीसाठी संसदेपासून उत्तरप्रदेशपर्यंत विरोधकांनी वातावरण तापवत ठेवले आहे. बहुधा मिश्रांमुळे होणारी अडचण लक्षात घेत त्यांच्यापासून अंतर राखण्यास भाजपा नेत्यांनी सुरुवात केली आहे. ते ज्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या बैठकांमध्येही त्यांना सहभागी करून घेतलेले दिसत नाही. त्यामुळे लवकरच त्यांच्याबाबतीत योग्य निर्णय होणयाची शक्यता आहे.
कृषि कायदे मागे घेण्यामागे हे हत्याकांडही एक कारण असल्याचे सांगितले जाते. ते कायदे मागे घेऊन केलेली कमाई पत्रकारांना शिवीगाळ, धमक्या देऊन आरोपी आशिषचे वडील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी धुळीस मिळवली. पुन्हा एकदा हे प्रकरण गाजू लागले. त्यात उत्तरप्रदेशातील राजकीय समीकरणे लक्षात घेता मिश्रांना थेट बाहेरचा रस्ता दाखवणे तोंडावर आलेल्या निवडणुकीमुळे सोपं नाही. त्यामुळे त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न भाजपाच्या गोटातून होत आहे.
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी एसआयटीच्या तपासानंतर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. त्याचवेळी भाजप हायकमांड यावर काहीही बोलण्याचे टाळत आहे. अजय मिश्रा टेनी यांच्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे राजकीय अंदाजांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधून आलेल्या सर्व खासदारांना त्यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले होते. उत्तरप्रदेशातून निवडून आलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी या बैठकीला पोहोचले नाहीत. मात्र, या बैठकीसाठी ‘टेनी’ला आमंत्रित करण्यात आले होते की नाही, याची पुष्टी झालेली नाही.
अजय मिश्रा टेनी यापूर्वी लखनऊमध्ये झालेल्या डीजीपी कॉन्फरन्समध्येही पंतप्रधान मोदींसोबत दिसले नव्हते. अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या या परिषदेत गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या खात्याचे दोन राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि नित्यानंद राय उपस्थित होते. हे प्रकरण सोशल मीडियावरही चर्चेत आले होते.