मुक्तपीठ टीम
शुक्रवारी राज्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण आढळले. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत सीआरपीसी कलम १४४ लागू केले. यामुळे पुढील दोन दिवस मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी आहे.
दोन दिवस लागू करण्यात आला आहे कलम १४४
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
आदेशात म्हटल्याप्रमाणे, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षा केली जाईल.
कोरोनाची राज्यातील ठळक माहिती
राज्यात ओमायक्रॉनचे आणखी ७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ६९५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६३१ बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
९६७८ | ५१७६१ | ६१४३९ | ९६७८ | १२४९ | १०९२७ | २० | ५ | २५ |