मुक्तपीठ टीम
बुधवारी तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने देशाचे नुकसान झाले असून सीडीएस हे पद ही रिक्त झाले आहे. सरकार लवकरच नव्या सीडीएस जनरल यांच्या नियुक्तीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सीडीएस पदासाठी सर्वाधिक पात्र समजल्या जाणाऱ्यांमध्ये लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे.
लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांच्या बाजूने अनेक सेवानिवृत्त लष्करी कमांडर म्हणाले की, जनरल नरवणे यांना या पदावर नियुक्त करणे एक विवेकपूर्ण पाऊल असेल कारण ते ५ महिन्यांत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत.
नव्या सीडीएसच्या नियुक्तीसाठी सरकार लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ कमांडर्सची एक समिती स्थापन करणार आहे. तिन्ही सेवादलांची ही समिती येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊन पुढील नियुक्ती करेल.
तिन्ही दलांच्या समितीने शिफारस केलेली नावं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे अंतिम करण्यासाठी पाठवली जाणार आहेत. संरक्षण मंत्र्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर, नावं मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे विचारासाठी पाठवली जातील, जी भारताच्या पुढील सीडीएसच्या नावावर अंतिम निर्णय घेईल. या प्रकरणातील तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे.
सीडीएसची नियुक्ती प्रक्रिया
- सध्या देशात सीडीएसच्या नियुक्तीसाठी कोणताही नियम किंवा प्रक्रिया नाही.
- सीमा सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन सरकार नवीन सीडीएस पद नियुक्त करणार आहे.
- सध्या सीडीएसच्या नियुक्तीचे मुलभूत निकष अगदी सोपे आहेत.
- लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांचा कमांडिंग ऑफिसर सीडीएस पदासाठी पात्र आहे.
- लष्करी अधिकाऱ्याच्या गुणवत्तेसह ज्येष्ठतेच्या आधारे सरकारने निर्णय घ्यावा.
- सीडीएस म्हणून नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे हे जनरल बिपीन रावत यांच्यानंतर लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
जनरल नरवणे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२२ मध्ये संपत आहे, त्यामुळे ते सीडीएस पदासाठी सर्वात योग्य मानले जात आहेत.
जनरल नरवणे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये जनरल बिपीन रावत यांच्याकडून भारतीय लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. तसेच सशस्त्र दलांच्या इतर दोन प्रमुखांच्या तुलनेत त्यांना ज्येष्ठतेच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे. जनरल नरवणे यांची कामगिरी आणि त्यांनी पूर्व लडाखमधील अडथळे ज्या पद्धतीने हाताळले ते लक्षात घेता त्यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती होण्याची शक्यता जास्त आहे. एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी आणि अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्या नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. जनरल बिपीन रावत यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवण्यात आले तेव्हा त्यांच्यापेक्षा दोन अधिकारी वरिष्ठ होते.