मुक्तपीठ टीम
भारतात स्मार्टफोन युजर्संची संख्या कोटींच्या घरात आहे. मात्र, देशात अजूनही असे युजर्स आहेत जे सध्या फीचर फोन वापरत आहेत. या यूजर्सना लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लवकरच फिचर फोनसाठीही डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, यूपीआय पेमेंटची मर्यादा २ लाखांवरून ५ लाख करण्याची घोषणाही केली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारतात ११८ कोटी यूजर्स आहेत, त्यापैकी ७४ कोटी यूजर्स स्मार्टफोन वापरतात. हा आकडा पाहता, असे म्हणता येईल की, देशात अजूनही फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन, यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने देखील लाँच केली जातील, जेणेकरून अधिकाधिक लोक ऑनलाइन पेमेंट करू शकतील.
रिझर्व बँक ऑफ इंडिया गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,
- यूपीआय ही देशातील सर्वात मोठी रिटेल पेमेंट सिस्टम आहे, ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो.
- ते पुढे म्हणाले की, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने सादर करू.
- त्यामुळे फीचर फोन यूजर्सदेखील या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील.
- याशिवाय ट्रान्झॅक्शन फ्लोमध्ये सुधारणा करण्यासाठी लवकरच यूपीआय वॉलेट अॅप देखील लाँच केले जाईल.
यूपीआय म्हणजे काय?
- यूपीआय हा युनिफाइड पेमेंट इंटरफेस आहे.
- ही प्रणाली मोबाईल अॅपद्वारे कार्य करते आणि ती खूपच सुरक्षित आहे.
- या प्रणालीद्वारे बिल पेमेंटसाठी ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता.
- ऑनलाइन पेमेंटसाठी बँक खाते यूपीआयशी लिंक करणे अनिवार्य आहे.