मुक्तपीठ टीम
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचा समारोप गुरुवार, दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे युवा नेता कन्हैयाकुमार यांच्या हस्ते होणार आहे. लोकशाही बचाव सभा असून, या सभेला कन्हैयाकुमार मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “आदरणीय सोनिया गांधी यांची त्यागवृत्ती कायमच प्रेरणा देणारी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून २००४ सालापासून सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताह आयोजित केला जातो. विविध सामाजिक कार्यक्रम यामध्ये होतात. यंदा महागाईवरील रांगोळी स्पर्धा, बालअत्याचारविरोधी जागृती, १९७१ च्या युद्धातील वीरांचा, वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान, मान्यवरांचे व्याख्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने आदी विशेष कार्यक्रम झाले आहेत.”
समारोप कार्यक्रमाला बहुसंख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता नदीपात्रात गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधक निर्बंधांचे पालन करत हे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.