मुक्तपीठ टीम
बाल लैंगिक अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. समाजामध्ये जागृती करून लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखायला हव्यात. ‘१०९८’ ही चाईल्ड हेल्पलाईन गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. समाजातील प्रत्येकाने या हेल्पलाईनचा प्रभावी वापर केला, तर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत बाल लैंगिक अत्याचारविरोधी जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवार पेठेतील कन्या शाळेत महारांगोळी काढून प्रबोधनात्मक पोस्टर्स हातात घेऊन दिवे व मशाली प्रज्वलीत करत प्रतिज्ञा घेण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईन ‘१०९८’चे महत्व सांगण्यात आले.
यावेळी सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, प्रशांत सुरसे, पियुष शहा, प्रवीण करपे, राजाभाऊ नाणेकर, संजय देशमुख, अंजली सोलापूरे, सारिका आगज्ञात यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “या सप्ताहात दरवर्षी सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन त्याचे मोहिमेत रूपांतर केले जाते. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. अशा घटना रोखण्यासाठी त्याविरोधात जागृती होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या वतीने १०९८ ही चाईल्ड हेल्पलाईन सर्वदूर पसरवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील.”