मुक्तपीठ टीम
शिवसेना आणि काँग्रेससारखे परस्परविरोधी असणारे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात एकत्र आले. भाजपाविरोधात महाविकास आघाडी साकारली. भाजपाला शह देत सत्तेवर आली. तसाच भाजपाविरोधी असणाऱ्या मात्र परस्परविरोधी भूमिकेतील पक्षांच्या आघाडीचा प्रयोग देशातही करण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनीच ही माहिती दिली आहे.
आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.
या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवारसाहेब करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने पवारसाहेब काम करत आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्यावर असताना त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवारसाहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.