मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन नवा व्हेरिएंट जगभर चिंता वाढवत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे धोकादायक परिस्थिती या नव्या व्हेरिएंटमुळे निर्माण होऊ नये यासाठी अनेक देशांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. याच खबरदारीतून अनेक देशांमध्ये प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. पण ‘केवळ प्रवासावर निर्बंध लावून नव्या व्हेरिएंटचा प्रसार कमी होणार नाही, त्यामुळे ६० वर्षांवरील लोकांनी प्रवास टाळावा’ असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
ओमिक्रॉन विषाणू अतिशय धोकादायक!
- ओमिक्रॉन विषाणू अतिशय धोकादायक असल्याचे वर्णन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
- लसीकरण टाळणाऱ्या व्यक्तींमुळे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे या विषाणुचा प्रसार अधिक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
- नव्या व्हेरीएंटबाबत अजूनही सर्वत्र अनिश्चतता आहे, त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
आधी कोरोना झालेल्यांना धोका जास्त
- प्राथमिक निरीक्षणावरून असे दिसून आले आहे की ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांना नव्या व्हेरिएंटपासुन अधिक संरक्षणाची आवश्यकता आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेकडुन याबाबत माहिती देण्यात आली.
- नवीन व्हेरिएंटचे संक्रमण आधी कोरोना झालेल्या व्यक्तींना वेगाने होऊ शकते.
- त्यामुळे अशा व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीच सर्वात धोकादायक!
- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डेल्टा किंवा डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या व्हेरीएंटचा सर्वाधिक संसर्ग कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींना झाला.
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये देखील अनेक जणांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होती.
- यावरून रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे सर्वात धोकादायक असल्याचे स्पष्ट होते.
लसीकरण पूर्ण होणे आवश्यक
“संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी जितका जास्त वेळ घेतो तितक्या वेगाने व्हायरस म्युटेट होईल आणि वेगाने पसरेल. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे.” असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले आहे. यासोबतच कोरोनाविरुद्ध अजून एक दीर्घ लढाई लढायची आहे, असे देखील ते म्हणाले.
ओमिक्रॉन धोकादायक – जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण होणाऱ्या जागतिक धोक्याबद्दल कठोर आणि स्पष्ट इशारा जारी केला आहे. आतापर्यंतच्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट गंभीर परिणाम घडवू शकतात. जपान, फ्रान्स आणि स्पेनमध्ये ओमिक्रॉन संसर्गाची चिंताजनक नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे.