मुक्तपीठ टीम
नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, नाशिकचे वनसंरक्षक अ.मो. अंजनकर, धुळे वनसंरक्षक डी. डब्लु. पगार, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, नंदुरबारचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी आर.ए.कुलकर्णी आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावात सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल. नियमानुसार काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल या दृष्टीने काम करावे असेही ते म्हणाले.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा
अक्कलकुवा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक आदिवासींना कामे उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यात यावे असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जलसंधारण कामांबाबत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, मृद व जलसंधारणचे सहसचिव डी.एस.प्रक्षाळे, जलसंधारणचे अवर सचिव अ.र.जगताप, उपविभागीय अधिकारी सुनिल पवार उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तेथील स्थानिक आदिवासींना धरणातील गाळ काढणे अशी जलसंधारणाची कामे देण्यात यावी. कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यांनी संयुक्तिकरित्या स्थानिक आदिवासी, शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यास सहकार्य करावे, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.