मुक्तपीठ टीम
एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाबाबत सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात साडेचार तासाची चर्चा झाली. या चर्चेत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतनवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
काय म्हणाले अनिल परब?
- या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
- मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली.
- मागील काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत.
- आज मला शरद पवार यांनी बोलावलं होतं.
- अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली.
- यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली.
- शरद पवार यांना सर्व माहिती दिली.
- याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबतही चर्चा झाली.
सरकारकडून समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा
- विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे.
- सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली.
- विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु.
- हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल.
- पण त्यासमोर आपण काय बाजू मांडायची याबाबत आज सविस्तर चर्चा पवारांसोबत झाली.
मध्यम मार्ग काढायला हवा
- पगारवाढ किंवा खासगीकरण असा विशेष मुद्दा काही चर्चचा विषय नाही, काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली.
- हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे असेही अनिल परब यांनी म्हटले.