अंजली रोडत
सध्या कुणाला भेटायला गेल्यावर त्यांनी चहा-पाणी काही विचारलं नाही तरी चालतं, पण मोबाइल चार्ज करायचा आहे का? असे विचारले तर कसं बरं वाटतं. मोबाइल फोन झाला आहे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक! थोडा वेळ मोबाइल वाजला नाही तर कसं चुकल्या-चुकल्यासारखं होतं. मग त्याची बॅटरी सपंली तर आता जगायचं कसं, असंच वाटू लागतं. मोबाइल बॅटरीची क्षमता कितीही वाढली आता ती सात हजार एमएच पर्यंत जरी पोहचली असली तरी तीही कमीच पडते. कधी ना कधी संपते. आता विचार करा, अशा वेळी आपल्याला कुठेही वायर न जोडता थेट हवेतूनच मोबाइल चार्ज करता आला तर? चार्जिंग हवेतून असलं तरी उगाच काही तरी हवेतलं सांगत नाही मी, तुम्हाला सध्या प्रगतीपथावर असलेल्या एका तंत्रज्ञानाबद्दलच माहिती देत आहे.
शाओमीचा एअर चार्जर असणार तरी कसा?
शाओमीने नवीन वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान असलेला ‘एमआय एअर चार्जर’ आणला आहे. याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
• मोबाईल चार्ज करण्यासाठी आता वापरकर्त्याला कोणतीही केबल किंवा पॅड किंवा वासरलेस चार्जिंग स्टॅंडची गरज लागणार नाही
• एअर चार्जर तंत्रज्ञानामुळे कित्येक मीटर अंतरावरुनही मोबाईल चार्ज करता येईल
• शाओमीने एक खास चार्जिंग ब्लॉक बनवला आहे
• चार्जिंग ब्लॉकमध्ये जवळजवळ १४४ अँटेना आहेत
• हे अँटेना मिलीमीटर-वाइड वेव ट्रांसमिट करतात
• ही वेव मोबाईलमध्ये जाते ज्यामुळे बिमफॉर्मिंगमुळे फोन चार्ज होतो
• चार्जिंग ब्लॉक स्मार्टफोनचे लोकेशन माहीत करून घेण्यासाठी पाच वेगवेगळ्या अँटेनांचा वापर करतो
चार्जिंगची ऊर्जा पुरवणार अँटेना
या तंत्रज्ञानासाठी शाओमी आपल्या ट्रेडमार्क टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करत आहे. यासाठी मोबाईल मध्ये बिल्ट-इन बीकन अँटेना आणि रिसीविंग अँटेनाची गरज आहे. बीकन अँटेना फोनचे स्थान निश्चित करते तर रिसिव्हिंग अँटेना चार्जिंग ब्लॉकपासून मिलीमीटर वेव्हला विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित करते.
एका वेळी फक्त एक डिव्हाइस चार्ज जाईल
सुरुवातीला हे तंत्रज्ञान एका मीटरने अनेक मीटरच्या रेंजवर चार्ज करण्यासाठी ५ डब्ल्यू रिमोट चार्जचा वापर करेल. कंपनीचा असा दावा आहे की, त्यात मल्टी-डिव्हाइस सपोर्ट देखील जोडला जाईल, जेणेकरून एकापेक्षा जास्त उपकरणांना ५ वॅट चार्ज सपोर्ट मिळेल. कंपनीने सध्या स्मार्टफोनसाठी हे नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केले आहे. भविष्यात हे स्मार्टवॉच, ब्रेसलेट, स्पीकर्स, डेस्क लॅंप यासह इतर उत्पादनांमध्येही जोडले जाईल.
सध्या लॉन्च बाबत काही ठरले नाही
कंपनीने सध्या एक कल्पना मांडली आहे. पण त्याचा अर्थ शाओमीकडे तंत्रज्ञान तयार असणार, असे मानले जाते. यावर्षी हा एअर चार्जर कोणत्याही मोबाईल सोबत दिला जाणार नाही. कंपनीने अद्याप हे चार्जर बनवण्यासाठी कोणत्याही रेग्युलेटरी अॅप्रुवलसाठी अर्ज केलेला आहे की नाही, ते अद्याप स्पष्ट नाही.