मुक्तपीठ टीम
डॉक्टरच्या रूपात देवच संकट काळात धाऊन येतो! असे म्हणतात ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सिद्ध केले आहे. सोमवारी डॉ.भागवत कराड हे दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट मधुन प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. क्रू मेंबर्सनी मदतीसाठी आवाहन केल्याचे ऐकून केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवाशावर प्राथमिक उपचार करून त्याचा जीव वाचवला. भूतकाळात इतरही राजकीय नेत्यांनी गरजूंच्या मदतीला धावून जात माणुसकी अनलिमिटेड असल्याचे दाखवून दिले आहे. ताजे उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीचे आहे.
पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक!
- केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांच्या तत्परतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
- केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांच्या या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.
- याबाबत इंडिगो एअरलाइन्सने देखील केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांचे कौतुक केले असून, ट्विटच्या माध्यमातुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.
- एअरलाइनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कर्तव्याप्रती सदैव जागरुक राहिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री यांचे मनापासून कौतुक करतो. डॉ. भागवत कराड सहप्रवाशाला मदत करण्यासाठी तुमचा ऐच्छिक पाठिंबा खूप प्रेरणादायी आहे.’
कौतुकाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत ‘सेवा आणि समर्पण’ यातून देश आणि जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी चालत असल्याचे म्हटले आहे.
मदतीसाठी प्रोटोकॉलही मोडला
प्रवाशाला मदत करण्यासाठी डॉ.कराड यांना केंद्रीय मंत्री म्हणून प्रोटोकॉल तोडावा लागला, मात्र त्यांची ही प्रतिक्रियेने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मन त्यांनी जिंकले. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. डॉ.कराड यांनी ही संपूर्ण घटना आणि त्यांचा अनुभव त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केला आहे. डॉ भागवत कराड हे महाराष्ट्राचे खासदार आहेत आणि जुलै २०२१ मध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून मोदी सरकारमध्ये सामील झाले.
कशी केली मदत?
राजकीय क्षेत्रात पक्ष भिन्न असलेले मात्र अडचणीच्या प्रसंगी एकत्र येऊन केलेल्या मदतीमुळे माणुकीचं चांगल उदाहरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी दिलं आहे. नुकतीच सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी पुण्यातील अपघातग्रस्तांना एकत्रित मदत केल्याचं पाहायला मिळालं. राजवर्धन पाटील यांनी वाहनाची व्यवस्था केली तर सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून अपघातग्रस्तांना ताबडतोड मदत होईल असे प्रयत्न केले.
काय आहे प्रकरण?
- बारामती इंदापूर रोड वरील अंथुर्णे येथे वाहनाचा अपघात झाला होता.
- या मार्गाने प्रवास करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघात पाहून गाडी थांबवली.
- त्याच मार्गावरून जाताना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनीही थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांना मदत केली.