मुक्तपीठ टीम
राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या १४ दिवसांपासून संप पुकारला आहे. संपामुळे सामान्य प्रवाशांना त्रास होत असल्याने एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचे प्रयत्न जोरात सुरु असल्याची चर्चा आहे.
एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन महामंडळाने दिले आहे. एकीकडे संपावरून कामावर परतण्यासाठी पोलीस संरक्षणाचे आश्वासन तर दुसरीकडे निलंबनाच्या कारवाईचा वेग वाढवत रोजगाराचं संरक्षण काढून घेण्याचं दबावतंत्रही एसटी प्रशासन वापरत आहे. गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संप फोडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे मानले जाते.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाची तीव्रता वाढतीच!
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यची राज्यात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत.
- काही आगारांच्या प्रवेशद्वारांवरच कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.
- काही आगारांना पोलिसांच्या छावणीचेही स्वरुप आले आहे.
- आझाद मैदानातही मोठ्या प्रमाणात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने होत आहेत.
- यात विलीनीकरणाची मागणी घेऊन काही कर्मचारी हाती फलक घेऊन उभे आहेत.
संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न
- संपाची तीव्रता पाहता एसटी महामंडळाने संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
- यानंतर राज्यातील संपकरी एसटीचे कर्मचारी पुन्हा रुजू होणारअसल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
- कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
- संपामुळे गुरुवारीही राज्यातील विविध आगार बंदच राहिले.
- त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे भाडे आकारून आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडण्यात आल्या.
कामावर परतणाऱ्यांना पोलीस संरक्षण
- परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी बुधवारी राज्यातील एसटीचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख आणि एसटीचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होण्यास तयार असल्याची माहिती दिली.
- अशा कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यावर संरक्षण देण्यात येईल.
- यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.
- एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे व सेवा पूर्ववत व्हावी यासाठी विशेष अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरुवारी केले १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित, दोन हजारावर निलंबित!
- गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे.
- गुरुवारी पुणे विभागातील सर्वाधिक १३८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
- तर जळगाव विभागातील ९१, ठाणे विभागातील ७३, बीड विभागातील ६७, मुंबई विभागातील ६४ व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.