जयदीप कवाडे / व्हा अभिव्यक्त!
दोन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयात होरपळून अकरा निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. दुसरीकडे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत अद्यापही पोहचली नसल्याने बळीराजा आत्महत्येच्या मार्ग अवलंबित आहे. एव्हढेच काय तर एसटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर आंदोलन करून दिवाळी साजरी करीत आहेत. दु:खाच्या सावट आणि ज्वलंत प्रश्न राज्यात प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आणि सर्वाधिक आत्महत्याग्रस्त बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे परळी शहरात दिवाळी शामीयानाचे आयोजन करून महामारीत प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीसोबत असामाजिक ‘ठुमके’ लगावत असल्याने त्यांचे वागणे खूपणारेच आहे.
बीडकरांना मीठाचा फराळ!
स्नेहमिलन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन करून ना. धनंजय मुंडेंनी तर सपना चौधरीच्या हातून आत्महत्याग्रस्त बिडकरांना एकप्रकारे मिठाचा फराळ दिला आहे. अतिवृष्टीमुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उध्वस्थ झालीच शिवाय गुरे-ढोरांना वाहत जाताना बिडकरांनी पाहीले. अश्या संघटातून गेलेला बळीराजा आतापर्यंत मदतीच्या प्रतिक्षेत असल्याने त्याच्या दिवाळी अंधारातच साजरी होत आहे. तसेच राज्यातील सामाजिक न्याय विभागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न संपत संपेना झाले आहे. याशिवाय बीड जिल्ह्यात ऊसतोड कामागारांचे प्रश्न कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडपण्याचे कामे सर्रास होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्रीपद भूषविणारे धनंजय मुंडें त्यांच्या खात्याचा गैरवापर डान्सींग कार्यक्रमातून करून कोणता संदेश देत आहे असा प्रश्न आज उभ्या महाराष्ट्राला पडत आहे.
या कृतीतून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन
२०१८ मध्येही धनंजय मुंडेंनी अश्याच प्रकारे सपना चौधरींना बोलावून नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून दिवाळी साजरी केली होती. त्यांना वेळेलाही अनेक प्रश्नांना मराठवाडा तोंड असतांनाही त्यांनी शामियाना थाटून ठुमके लगावले होते. बिडमध्ये सर्वाधिक दीडशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे बळीराजाच्या मदत पूर्ण करण्यास फोल ठरत आहे. यंदा दिवाळी स्नेह मिलनाचे कार्यक्रम व त्यातच सपना चौधरीच्या डान्स शो करून धनंजय मुंडेंनी आपली दिवाळी जोरात साजरी केली. परंतु, बळीराजाच्या जखमांवर मिठ चोळण्यात आलेल्या या कृतीतून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे.
(जयदीप कवाडे हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.)