मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे मोहित कंबोजने अपहरण केल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. त्याचे अपहरण करून क्रूझ टर्मिनलवर आणण्यात आले. मोहित कंबोजच्या मेहुण्यामार्फत आर्यन खानचे अपहरण झाले होते. मोहित कंबोजने आर्यनचे अपहरण करून पैसे उकळण्याची योजना आखली होती, मात्र एका सेल्फीमुळे त्याचे संपूर्ण नियोजन उद्ध्वस्त झाले. उडता पंजाबसारखा उडता महाराष्ट्र करण्याचा कट समीर वानखेडे आणि त्याच्या खासगी टीमने रचल्याचे मलिक म्हणाले.
शाहरुख खानला धमकी! – नवाब मलिक
- आता शाहरुख खानला धमकावले जात आहे की, नवाब मलिक यांनी बोलणे बंद केले नाही तर, तुझा मुलगा पुन्हा तुरुंगात जाईल.
- शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब स्वत: या प्रकरणात पीडित आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही, ते गुन्हेगार नाही.
- एखाद्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणीची मागणी केली आणि त्या बदल्यात त्याने खंडणीची रक्कम दिली, तर ते गुन्हेगार नसून पीडित आहे.
- मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की, जे कोणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा मोहित कंबोजचे. बळी ठरले आहेत त्यांनी पुढे यावे.
- यामुळे जे खरे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात पुरावे मिळतील आणि त्यांना शिक्षा होऊ शकेल. असे नवाब मलिक म्हणाले.
कॅबिनेट मंत्री अस्लम शेखही होते टार्गेट!
महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री असलम शेख यांना त्या क्रूझ पार्टीत नेण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, असेही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलिक म्हणाले की, “समीर वानखेडेची खासगी टीम मोठ्या घरातील मुलांना आणि चित्रपटातील सेलिब्रिटींना खोट्या प्रकरणात अडकवून पैसे उकळण्यासाठी टार्गेट करते.” समीर वानखेडे यांच्या खासगी फौजेत सुनील पाटील यांचाही सहभाग असल्याचे मलिक यांनी सांगितले.
एनसीबीचे काही अधिकारी वसूली रॅकेट चालवतात!
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे काही अधिकारी मुंबईत ड्रग्सचा काळा धंदा करत असून लोकांना खोट्या पद्धतीने आमिष दाखवत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले. मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि माने यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “हे सर्व जण लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे उकळतात.” आर्यन खान प्रकरणात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे मलिक म्हणाले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास राज्याची स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम याप्रकरणी काम करेल.